बांधकाम क्षेत्रात कामगारांसाठी २८ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:45 AM2019-01-11T03:45:24+5:302019-01-11T03:45:37+5:30
संभाजीराव पाटील-निलंगेकर : पनवेलमध्ये कामगारांसाठी लाभ वाटप सोहळा
पनवेल : इमारत बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधा पुरविण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने २८ योजना तयार केल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार, कौशल्य विकास व उद्योजकता कामगार, भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याणमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी गुरुवारी खांदेश्वर पनवेल येथे केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना लाभ वाटप सोहळा खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सोहळ्यास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, उपमहापौर विक्र ांत पाटील, कामगार उद्योग, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, कामगार आयुक्त राजीव जाधव, मंडळाचे सदस्य श्रीपाद कुसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निलंगेकर म्हणाले, राज्यात २७ लाख बांधकाम कामगार असणे अपेक्षित होते. मात्र, मंडळाकडे नोंदणी केवळ १ लाख ४० हजार कामगारांचीच होती. सरकारने अटल विश्वकर्मा योजना जाहीर केली. त्यानंतर या क्षेत्रात भरीव काम करण्यास सुरु वात झाली. आतापर्यंत मंडळाने १२ लाख कामगारांची नोंद केली आहे. तब्बल ४ लाख कामगारांना प्रत्यक्ष बँक खात्यात लाभ देण्यात आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या प्रसंगी नोंदीत बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते विविध लाभ तसेच अत्यावश्यक कीट व सुरक्षा कीट वाटप करण्यात आले. कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव सी. श्रीरंगम यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.