वर्षभरात दुचाकीचे २८६ अपघात, १२७ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 05:21 AM2019-03-19T05:21:45+5:302019-03-19T05:22:06+5:30
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक वर्षामध्ये मोटारसायकलचे तब्बल २८६ अपघात झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक वर्षामध्ये मोटारसायकलचे तब्बल २८६ अपघात झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन - पनवेल महामार्ग, जुना मुंबई - पुणे महामार्ग, मुंबई- गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. २०१८ मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल १२०३ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ९२० जण जखमी झाले असून २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये २८६ अपघात मोटारसायकलचे आहेत. यामध्ये २५२ जण जखमी झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मोटारसायकल अपघाताच्या ५० टक्के अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानी होण्याचा व डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढत आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरोधात पोलीस नियमित कारवाई करत असतात, परंतु यानंतरही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. यामुळे पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
१९ मार्चला ऐरोली नॉलेज पार्क येथून हे अभियान सुरू केले जात आहे. पोलीस आयुक्त संजीव कुमार स्वत: उपस्थित राहणार आहेत.
अपघातांचे प्रमाण चिंताजनक
आयुक्तालय क्षेत्रामध्ये किमान रोज एक मोटारसायकलचा अपघात होत आहे. दोन दिवसामधून एक गंभीर अपघात होत असून प्रत्येक तिसऱ्या दिवशी एकाचा मृत्यू होत आहे. मोटारसायकल अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून ते थांबविण्यासाठी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.