नवी मुंबई : कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी, अर्ज, निवेदने देण्यासाठी तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी केंद्रीय नोंदणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २९ हजार ५०४ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात १५ ऑगस्ट २०२३ पासून केंद्रीय नोंदणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनातून आता टपाल सेवा ई-ऑफिसच्या माध्यमातून होत आहे. या नोंदणी केंद्राच्या माध्यमातून शासकीय व्यवहार वेगवान आणि अधिक पारदर्शी करण्यासाठी ते डिजिटल करण्यात आले आहेत. या केंद्रीय नोंदणीत आलेली टपालपत्रे विभागानुसार वेगळी केली जातात. त्यासाठी प्रत्येक विभागाचा वेगळा कक्ष तयार करण्यात आला आहे. केंद्रात आलेली टपालपत्रे स्कॅन करून प्रत्येक विभागामध्ये पोहोचवली जातात. त्यांची पोहोच संबंधित अर्जदाराला मोबाइल संदेशाद्वारे पाठविला जाते. अर्जदार संबंधित मॅसेजवर ऑनलाइन अर्जाची सद्य:स्थिती पाहू शकतो. या आधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याचे डॉ. कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या नोंदणी केंद्रात आतापर्यंत २९ हजार ५०४ अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.