Navi Mumbai: जर्मनीत नोकरीसह मुलांच्या शिक्षणाचे आमिष दाखवून डॉक्टर दांपत्याला ३ कोटी २९ लाखांचा गंडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 22, 2024 07:35 PM2024-07-22T19:35:34+5:302024-07-22T19:35:50+5:30
Navi Mumbai: सीवूड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याची ३ कोटी २९ लाखांच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. पती पत्नीला जर्मनीत नोकरीला लावण्याची तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - सीवूड परिसरात राहणाऱ्या डॉक्टर दांपत्याची ३ कोटी २९ लाखांच्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. पती पत्नीला जर्मनीत नोकरीला लावण्याची तसेच मुलांना शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीवूड परिसरात राहणारे डॉक्टर दांपत्य त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलिया येथे शिक्षणासाठी पाठवण्याच्या तयारीत होते. यादरम्यान त्यांची ओळख जुगनू कोळी व तेजस्वी कोळी या दाम्पत्यांसोबत झाली होती. त्यांची "लिवी ओव्हरसीज स्टडी" अकॅडमी असून त्याद्वारे ते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देतात असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून या डॉक्टर दाम्पत्याने मुलाला ऑस्ट्रेलिया येथे शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याकरिता साडेआठ लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर काहीच दिवसात कोळी दाम्पत्याने त्यांना ऑस्ट्रेलिया ऐवजी जर्मनीत शिक्षण चांगले असून तिथे प्रवेश मिळवून देतो असे सांगितले.
शिवाय त्याठिकाणी डॉक्टरांना देखील चांगली संधी असून दोघा दाम्पत्याला देखील जर्मनीत नोकरीचे स्वप्न दाखवले. यासाठी त्याने जर्मन भाषा शिकण्याचे क्लास देखील त्यांना लावण्यास सांगितले. शिवाय वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी २९ लाख रुपये उकळले. मात्र यानंतरही त्याच्याकडून कोणतीही कागोदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अखेर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांनी झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असून जुगनू कोळी व तेजस्वी कोळी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.