दक्षिण रायगडमधील नगरपंचायतींना ३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:22 AM2021-01-13T02:22:12+5:302021-01-13T02:22:23+5:30
नवीन नगरपंचायत साहाय्य योजनेचा माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळाला लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये निधी मिळविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे. नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून नगरपंचायत माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा यांना खात्यामध्ये ३ कोटी रूपयांचा निधी जमा झाल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी विराज लबडे यांनी दिली आहे. महाड, माणगांव विधानसभा मतदार संघाचे आ.भरत गोगावले यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, मुरूड, अलिबाग, खोपोली, माथेरान, श्रीवर्धन, कर्जत, पेण, उरण या नगरपालिका आणि पाच वर्षांपूर्वी नव्याने निर्माण झालेल्या म्हसळा, माणगांव, पोलादपूर, तळा या नगरपंचायतींसाठी अनुदानाची मागणी महाड, माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार माणगांव १ कोटी २५ लाख, म्हसळा ४५ लाख, श्रीवर्धन १ कोटी २० लाख, तळा १ कोटी या नगर पंचायतीना मंजूर करण्यात आले आहेत.
आगामी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगांव नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर म्हसळा, श्रीवर्धन, तळा नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध झाल्याने आ.गोगावले यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
यावेळी आ.गोगावले यांच्यासोबत अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आ. महेंद्र दळवी यांनी देखील अलिबाग नगरपालिकेसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आ.गोगावले आणि आ.दळवी यांना नगरविकास मंत्रालयाने संबंधित नगरपंचायती व नगरपालिका यांच्या खात्यात विकास निधी जमा केल्याचे पत्र सुपूर्द केले. हे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नगवणे यांनी त्या त्या नगर पंचायतींना शिवसेना पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे.
n यावेळी शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, इंदापूर सरपंच नगवणे, माणगांव शाखाप्रमुख अजित तार्लेकर, गटनेते सचिन बोंबले, नगरसेवक नितीन बामुगडे, सेना युवा पदाधिकारी सुनील पवार, पत्रकार अरुण पवार, राजेंद्र नवगणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.