लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर विभागातील सेक्टर १९ मधील शहाबाज गाव येथील इंदिरा निवास ही चार मजली अनधिकृत इमारत शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. मोहम्मद मिराज (२९), शफिक अहमद अन्सारी (३०), मिराज अन्सारी (२४) अशी मृतांची नावे असून, ५५ जणांचे जीव वाचले आहेत. या इमारतीमध्ये एकूण ३ दुकाने व १७ घरे होती.
इमारत कोसळण्याआधी इमारतीमधून आवाज येऊ लागल्याने इमारतीमधील ३९ प्रौढ आणि १६ मुले सुरक्षित बाहेर पडले. सुरक्षित बाहेर पडलेल्यांव्यतिरिक्त आणखी दोघांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इमारत कोसळताच स्थानिक मदतीसाठी धावले. त्यांनी तिघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले. नवी मुंबई पालिकेचे अग्निशमन दल, पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण केले. इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा तपास करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
रिक्षाचालकाने वाचविले अनेकांचे प्राण
पहाटे शहाबाज परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षाचालकास इमारतीस तडे जात असल्याचा आवाज येताच त्याने प्रसंगावधान दाखवत इमारतींतील रहिवाशांना जागे करून त्यांना बाहेर पडण्यासाठी आवाहन केल्याने अनेकांचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे. सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात. पालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते साहाय्य उपलब्ध करावे, याबाबत पालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री