महिन्याभरात १०० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:57 PM2019-09-27T22:57:32+5:302019-09-27T22:57:40+5:30
अमली पदार्थ विरोधी कारवाई; २५ गुन्ह्यांत आतापर्यंत ३४ जणांना अटक
नवी मुंबई : पोलिसांच्या विशेष पथकाने परिमंडळ-१ मधून एनडीपीएस कायद्यांतर्गत महिनाभरात २५ गुन्हे दाखल करून ३४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाकडून या कारवाई केल्या जात आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अमली पदार्थांच्या पुरवठ्यामुळे व्यसनींचे आणि गुन्हेगारी कृत्यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. यासंदर्भात वेळोवेळी ‘लोकमत’ने आवाज उठवलेला आहे. मात्र, स्थानिक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे कारवाई होत नसल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात होते. मात्र, शहरात पसरत चाललेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याबाबत पोलीस आयुक्त संजय कुमार यांनीही गांभीर्य व्यक्त केले होते. त्यानुसार दोन्ही परिमंळमध्ये स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी परिमंडळ-१ मधील पथकाने उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे महिन्याभरात एनडीपीएस कायद्यांतर्गत २५ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ३४ जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर त्यांच्याकडून सुमारे १३ किलो गांजा व इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांनी हवालदार गणपत पवार, अर्चना कारखिले, संजय ठाकूर, संदीप निकम, विद्याधर कामडी, गणेश चौधरी, अमित वारे, विनायक गायकवाड, सागर सोनावणे व अपर्णा पवार यांच्या पथकामार्फत एपीएमसी आवारातील एका झोपडीत छापा टाकला.
या वेळी तिथे ८७ किलो ४०० ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी दयावान कराळे (२९) व सुरेखा सोनकांबळे (२८) या मामी, भाच्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून परिसरातील छोट्या गांजाविक्रेत्यांना तो पुरवला जायचा. कराळे याची आईही गांजाविक्री करताना यापूर्वी पकडली गेली असून सध्या ती कारागृहात असल्याची माहिती डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम, सहायक निरीक्षक जी. डी. देवडे आदी उपस्थित होते.
महिन्याभरात १२ लाख ५० हजार ५८० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तर महिन्याभरात केलेल्या कारवार्इंमध्ये सर्वाधिक सहा कारवाई एपीएमसी आवारातील आहेत.
विशेष पथकाने महिन्याभरात दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ कारवाई केल्या आहेत. त्यापैकी एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सहा, कोपरखैरणेत चार, वाशीत तीन, रबाळे एमआयडीसीमध्ये तीन, तुर्भे एमआयडीमध्ये तीन, रबाळे पोलीस ठाण्यात दोन तर सानपाडा, नेरुळ, एनआरआय व सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक कारवाईचा समावेश आहे. कारवाई केलेल्यांमध्ये गांजाची नशा करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे.