तुर्भेमधून ४२ किलो गांजा जप्त; एका महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:22 AM2019-12-29T00:22:41+5:302019-12-29T00:22:44+5:30
अमलीपदार्थ विक्रेत्यांवर छापासत्र सुरूच
नवी मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमलीपदार्थ विक्रेत्यांवरही छापासत्र सुरू केले आहे. खारघरमध्ये १५ लाख रूपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केल्यानंतर शुक्रवारी तुर्भेमधील अड्ड्यावर छापा टाकला. तेथून ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करून लक्ष्मी धुवार या महिलेस अटक केली आहे.
नवी मुंबई अमलीपदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकासह सर्व पोलीस ठाण्यात कुठेही अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिमंडळ एक उपआयुक्तांनी यासाठी एक विशेष पथकही तयार केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर होण्याची शक्यता आहे. गांजासह इतर अमलीपदार्थांची शहरात विक्री होणार असल्याची शक्यता असल्यामुळे पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. तुर्भे गाव सेक्टर २४मधील आयसीआयसीआय बँकेसमोरील रोडवर स्कायवॉकच्या जिन्याजवळ एक महिला गांजाविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सात वाजण्याच्या सुमारास तेथून लक्ष्मी धुवाला या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे ४२ किलो ९१० ग्रॅम गांजा सापडला आहे. याशिवाय ६०० रुपये रोख रक्कमही आढळली आहे. एकूण ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज तिच्याकडून हस्तगत केला असून, तिच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अमलीपदार्थविरोधी पथकाने सलग दोन दिवस मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी खारघरमधून केनिथ सिमन केझी व नामेनॉन डोझी इजिकेसिरिल या नायजेरीयन नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून ७ लाख रूपये किमतीच्या एम.डी.एम.ए.च्या १०० गोळ्या सापडल्या होत्या. याशिवाय २ लाख ६० हजार रुपये किमतीची एम्फेटामाइन पावडर व ५ लाख ३५ हजार रुपये किमतीची मॅसेक्लीन पावडर जप्त केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांमध्येही या गोळ्यांचे सेवन होण्याची शक्यता होती. पोलिसांच्या कारवाईचे शहरवासीयांकडूनही स्वागत होत आहे.
नागरिकांनाही आवाहन
अमलीपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गांजासह इतर अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे.
शहरात कुठेही अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नायजेरीयन नागरिकांकडून ७ लाख रुपये किमतीच्या एम.डी.एम.ए.च्या १०० गोळ्या, तसेच २ लाख ६० हजार रुपये किमतीची एम्फेटामाइन पावडर व ५ लाख ३५ हजार रुपये किमतीची मॅसेक्लीन पावडर जप्त केली आहे.