नवी मुंबई : राजस्थानमधील अमली पदार्थांचा तस्कर मिठालाल छोगालाल गुर्जर याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे ३ किलो अफीम जप्त केले आहे.नवी मुंबई उच्च शिक्षणाचे केंद्र असून येथील विद्यार्थ्यांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविण्यासाठी तस्करांकडून प्रयत्न सुरू आहेत. ड्रग माफियांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. सहपोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तस्करांचा शोध घेत होते.२६ जुलैला नेरूळ एल. पी. ब्रीजजवळ राजस्थानमधून एक तस्कर अफीमची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सतीश सरफरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांच्या पथकाने सापळा रचून मिठालाल छोगालाल गुर्जर याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे जवळपास तीन किलो अफीम सापडलेआहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आरोपी राजस्थानमधील रहिवासी आहे. अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी त्याच्यावर अजून काही गुन्हे दाखल आहेत का याचाही पोलीस तपास करत आहेत. याशिवाय तो येथे कोणाला अफीम विकण्यासाठी आला होता याचीही चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार करत आहेत.
नेरूळमध्ये ३ किलो अफीम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:19 AM