कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारसंघनिहाय मतदारसंख्या जाहीर केली आहे. यानुसार आतापर्यंत एकूण ३ लाख ५९ हजार ७३७ मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती कोकण विभागाचे उपआयुक्त (सा.प्र.) तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली.
मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई शहर स्त्री मतदार १२ हजार ८७३ व पुरुष मतदार १७ हजार ९६९, तर तृतीयपंथी १ तसेच मुंबई उपनगर स्त्री मतदार ३६ हजार ८३८ व पुरुष मतदार ५२ हजार ९८७, तर तृतीयपंथी ५ असे एकूण १ लाख २० हजार ६७३ मतदार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शिक्षक मतदारसंघातील मुंबई शहरी भागात २ हजार १४ स्त्री, तर ५११ पुरुष मतदार आहेत. मुंबई उपनगरात ९ हजार ८७२ स्त्री मतदार, तर ३ हजार ४४२ पुरुष असे एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात पालघर जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या १२ हजार ९८७, तर पुरुष मतदारांची संख्या १५ हजार ९३० इतकी आहे. या मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या ८ आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात ४२ हजार ४७८ स्त्री, तर ५६ हजार ३७१ पुरुष मतदार आहेत. जिल्ह्यात फक्त ११ तृतीयपंथीची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे.
कोकण पदवीधरमध्ये २.२३ लाख मतदार
रायगड जिल्ह्यात स्त्री २३ हजार ३५६ व पुरुष ३० हजार ८४३, तर तृतीयपंथी ९ मतदार आहेत. रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८ व पुरुष १३ हजार ४५३ मतदारांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ हजार ४९८ स्त्री मतदार नोंदविले गेले आहेत, तर पुरुष मतदारांची संख्या ११ हजार ५३ इतकी आहे. अशा प्रकारे कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदार २६ जून रोजी मतदानाचा हक्क बजावतील, असे अमोल यादव यांनी स्पष्ट केले.