अभियंत्याला फेसबुकवरील मैत्री पडली महागात ट्रेडिंगचा बहाण्याने ३ लाख ७१ हजाराचा गंडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 19, 2023 09:18 PM2023-07-19T21:18:57+5:302023-07-19T21:19:04+5:30
बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याची ३ लाख ७१ हजाराची फसवणूक झाली आहे. अज्ञाताने फेसबुकवर महिलेच्या नावाने त्यांच्यासोबत ओळख वाढवून ट्रेडिंगमध्ये नफा असल्याचे सांगून गुंतवणूक करून घेतली होती. त्यानंतर मात्र पैशाची परतफेड न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बुधवारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल महापालिकेचे कनिष्ठ अभियंता आकाश गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची फेसबुकवर एका महिलेसोबत ओळख झाली होती. या महिलेने ती ट्रेडिंग करत असून आकाश यांनाही नफा मिळवून देईल असे सांगितले होते. शिवाय हा कोणताही गैरप्रकार नसून आपण मराठी आहोत असे बोलून त्यांचा विश्वास संपादित केला होता. तिच्यावर विश्वास ठेवून आकाश यांनी ३ लाख ७१ हजार रुपये संबंधित खात्यावर टप्प्या टप्प्याने पाठवले होते.
त्यानंतर मात्र ना नफा मिळाला ना भरलेली रक्कम. यामुळे त्यांनी तिच्याकडे तगादा लावला असता त्यांना प्रतिसाद मिळायचा बंद झाला. यामुळे त्यांनी संबंधित फेसबुक अकाउंट बद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यावरील मोबाईल नंबर एका पुरुषाचा असल्याचे समोर आले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.