नवी मुंबई : नेरुळमधील सारसोळे गावामध्ये ऑगस्ट महिन्यात तुलसीदर्शन इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसाहाय्यता कक्षाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री अर्थसाहाय्य निधीमधून असंख्य गोरगरिबांच्या शस्त्रक्रिया पार पडत असून त्यांचे उपचारही व्यवस्थितरीत्या होत असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाने आपल्या कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या ४ महिन्यात गोरगरीब -गरजू रुग्णांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश केला असून, कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविल्याचे आमदार म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. आमदार म्हात्रे यांनी केलेल्या शिफारशींमुळे १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नवी मुंबई क्षेत्रातील गरीब, गरजू २३ रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमधून २५ लाख ३२ हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळाला आहे. नेरुळमधील सारसोळे येथील तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेतील रुग्णांना मुख्यमंत्री अर्थसाहाय्य निधीमधून आर्थिक मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आमदार म्हात्रे यांनी आभार मानले.