पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून ५० ट्रक साहित्य रवाना; स्वच्छतेसह वैद्यकीय पथकांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:41 AM2019-08-18T00:41:04+5:302019-08-18T00:41:15+5:30
देशातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये नवी मुंबईकर सर्वात प्रथम मदतीसाठी धावून जातो.
नवी मुंबई : कोल्हापूर व सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईमधून मदतीचा ओघ सुरूच आहे. एक आठवड्यामध्ये तब्बल ५० ट्रकपेक्षा जास्त साहित्य पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांची विविध पथके दहा दिवसांपासून पूरग्रस्त परिसरात मदतकार्यात व्यस्त आहेत.
देशातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये नवी मुंबईकर सर्वात प्रथम मदतीसाठी धावून जातो. या पूर्वी केरळमधील व उत्तराखंडमधील पूर, गुजरात व इतर ठिकाणच्या भूकंपामध्येही नवी मुंबईमधून सर्वाधिक मदत संकलित झाली होती. सांगली व कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठीही शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिली आहे. १० जुलैपासून शहरातून पूरग्रस्त परिसराकडे मदत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, गृहनिर्माण संस्थांनी मदत उपलब्ध करून दिली आहे. १७ जुलैपर्यंत जवळपास ५० ट्रक साहित्य पाठविण्यात आले असून, त्यामध्ये धान्य, कपडे, ब्लँकेट, चटई व इतर साहित्याचा समावेश आहे.
पूरग्रस्त परिसरामध्ये देशभरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध होत आहे; परंतु तेथील नागरिकांना खरी गरज आहे ती स्वच्छतेसाठी सहकार्य करणाºया स्वयंसेवकांची. नवी मुंबई महानगरपालिकेने ७८ कर्मचाऱ्यांची तुकडी एक आठवड्यापूर्वीच पाठविली आहे. याशिवाय रविवारी समाज समता कर्मचारी संघटनेचे ४० सभासद पूरग्रस्त परिसरात मदतीसाठी गेले आहेत. माथाडी कर्मचाºयांनी प्रत्येकी २०० रुपये पूरग्रस्तांसाठी दिले असून, सर्व कामगारांनी एकूण ६० लाख रुपयांची मदत केली आहे.
आरोग्य पथकही तैनात
नवी मुंबई महानगरपालिकेने डॉक्टरांचे पथक सांगली व कोल्हापूरला पाठविले आहे. सांगलीमधील संतगाव, सूर्यगाव, बहे बोरगाव, गौडवाडी, साप्तेवाडी, पुनदी, शिरगाव, बुर्ली, दुधंडी, तुपारी या गावांमध्ये आरोग्य शिबिर घेऊन मोफत औषधे उपलब्ध करून दिली आहेत. डॉ. प्राची पाटील, प्रशांत थोरात, राणी गौतम, अक्षय पाडळे, राहुल पार्टे, रघू सावंत, दत्ता बुसरे, विजय पाटणे, सुनील शिंदे, आकाश शिंदे, मनोज जवळ, अविनाश ओंबळे, डॉ. सुरेश पवार, जयदीप खुले, सचिन जाधव, नागेश हिबरे, राजीव यादव, वीरेंद्र, पारखले, संतोष खांबलकर, मयूर कालगावकर, प्रा. प्रताप महाडीक, गणेश सत्रे, धवल सूर्यवंशी, विजय माने यांनी आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग घेतला आहे. सानपाडामधील सूरज हॉस्पिटलचे डॉ. आर. एन. पाटील यांच्यासह अनेकांनी औषधे उपलब्ध करून दिली.