नवी मुंबई : मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून ऑनलाईन तीस लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संबंधितावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती एकटी राहत असल्याचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत ओळख वाढवून तरुणाने हा प्रकार केला आहे.
पत्नी पासून वेगळे राहणाऱ्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. मात्र पतीच्या निधनानंतर पत्नीने बँक खात्याच्या पडताळणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार गोवा येथे राहणाऱ्या हरमन सिंग (५६) यांच्या तक्रारीवरून अमित सिंग (२७) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरमन यांचे पती उपकार सिंग हे काही वर्षांपासून सीबीडी परिसरात एकटे राहत होते. यादरम्यान यत्नाची अमित सिंग सोबत ओळख झाली होती. यादरम्यान उपकार सिंग हे एकटे असल्याचे व त्यांना वेळोवेळी मदतीच्या बहाण्याने अमित याने त्यांच्या ऑनलाईन बँक व्यवहाराचे पासवर्ड मिळवून ठेवले होते.
दरम्यान गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात उपकार सिंग यांची प्रकृती खालावली असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच २८ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. यावेळी उपकार यांच्या ऑनलाईन बँकिंगचा वापर करून अमित याने त्यांच्या खात्यातील ३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतले होते. पतीच्या निधनानंतर पत्नी हरमन यांच्याकडून पतीच्या बँक खात्याच्या व्यवहारांची पडताळणी सुरु होती. त्यामध्ये पतीच्या निधनानंतर खात्यातून पैसे वळवण्यात आले असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला असता, पडताळणी अंती अमित सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.