मराठी माणसांना 300, तर परप्रांतीयांना 400 रुपये भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 09:20 AM2022-01-26T09:20:42+5:302022-01-26T09:21:08+5:30

पनवेलमध्ये खासगी वाहनधारकांकडून सर्रास लूट

300 for Marathi people and Rs. 400 for foreigners | मराठी माणसांना 300, तर परप्रांतीयांना 400 रुपये भाडे

मराठी माणसांना 300, तर परप्रांतीयांना 400 रुपये भाडे

Next

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल आगारातील बस गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहेत. यादरम्यान एसटी बसस्थानकात खासगी वाहनांनी ठाण मांडले आहे. वाढीव प्रवास दर घेत सर्रास प्रवाशांची लूट सुरू केली आहे. महाड, माणगावसाठी मराठी बोलणारा आला तर त्यास इकोधारकाकडून ३०० रुपये घेतले जातात, तर त्या मार्गावर परप्रांतीय आल्यास त्याच्याकडून ४०० रुपये वसूल केले जात आहेत. दिवसेंदिवस खासगी वाहनधारकांची दादागिरी वाढत चालली आहे. त्यास आळा बसविणे गरजेचे आहे.

८ नोव्हेंबरपासून पनवेल आगारातील लालपरी रुसल्याने पनवेल ग्रामीणसह शहरी भागात खासगी वाहनधारकांनी कब्जा केला आहे. रीतसर दर न आकारता मनमानी दर आकारण्यास सुरुवात केली आहे. यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. पनवेल बसस्थानक परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत खासगी वाहने भरण्यासाठी रस्त्यावर आडवीतिडवी लावली जात आहेत. एका ट्रीपसाठी २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारत आहेत. यासाठी एजंट नसले तरी स्वत:च गाडीत जोरजोरात आवाज देऊन प्रवासी भरत आहेत.

एजंटगिरी नाही; पण वाहने स्वत:च भरतात
पनवेल परिसरात एजंटगिरी नसल्याचे दिसून आले आहे. इको, वडाप गाड्या स्वत:च भरतात. मात्र जास्त दर आकारत आहेत, तर पर्याय नसल्याने प्रवासी पैसे देत आहेत. अलिबाग, महाड, माणगाव यासाठी खासगी वाहने दिवसभर प्रवासी भरतात.

एसटीच्या कमी फेऱ्या
आठवडाभरापासून अलिबाग, पेण महाड मार्गावर ५ एसटी सुरू झाल्या आहेत. मात्र, एसटीच्या कमी फेऱ्या असल्यामुळे त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना झाला आहे. संप काळात दोन महिन्यांपासून एसटी बंद असल्याने खासगी वाहनधारकांची मनमानी वाढली आहे.

प्रशासनाकडून फेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न
प्रवाशांना एसटी बंद असल्याचा त्रास होऊ नये यासाठी खासगी वाहनचालकांना परवानगी दिली आहे. जास्तीचे दर वसूल करीत असतील तर तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे, तर जास्तीत जास्त बस सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बस वाढल्या की खासगी वाहने कमी होतील. एसटी फेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: 300 for Marathi people and Rs. 400 for foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.