नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी चालना दिली जात आहे. देशभरात दहा हजार इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनासाठी प्रकाश जावडेकर नवी मुंबईमध्ये आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या योजनेतून ३० इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. पुढील वर्षभरात अजून १०० बस घेतल्या जाणार आहेत. अधिवेशन स्थळी या बसची जावडेकर यांनी पाहणी केली.
याविषयी शासनाच्या धोरणांविषयी माहिती देताना सांगितले की, इंधनावर होणारा खर्च व त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील महापालिकांना या बस खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास सात हजार बस खरेदीचे कार्यादेश देण्यात आले आहेत. अजून तीन हजार बस घेण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. पुढील वर्षभरात दहा हजार इलेक्ट्रिक बसेस रोडवर धावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बस व्यतिरिक्त दुचाकी व इतर इलेक्ट्रिक वाहनांनाही चालना दिली जात आहे. अशी वाहने घेतल्यास ३० टक्के सवलत दिली जात असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. राज्यभरातून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या बसची पाहणी केली. नवी मुंबईसाठी अजून १०० जादा बस उपलब्ध होण्याची शक्यता पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या योजनेतून ३० इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत.