नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त 30 हजार सानुग्रह अनुदान
By नामदेव मोरे | Published: October 31, 2023 04:22 PM2023-10-31T16:22:27+5:302023-10-31T16:23:12+5:30
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
नवी मुंबई: महानगर पालिकेतील कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 30 हजार व करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना 24 हजार रूपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. आशा वर्करना 14 हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे.
महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी - कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ठोक मानधनावर, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना .24 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे 24 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना 14 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मनपातील 4559 अधिकारी, कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आलेले असून त्यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.दिवाळी सणाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या कर्मचारीहिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांकडून स्वागत करण्यात आले आहे.