मेट्रो कारशेडची कंत्राटे देण्यापूर्वीच खर्चात ३११ कोटींची वाढ, ठेकेदारांचे होणार चांगभलं
By नारायण जाधव | Published: October 18, 2023 05:54 PM2023-10-18T17:54:19+5:302023-10-18T17:54:43+5:30
एमएमआरडीएने मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा मागविल्या होत्या.
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या बहुचर्चित मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ साठीची मोघरपाडा आणि मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या कशेळी डेपो बांधकामाचे कंत्राट देण्यापूर्वीच मूळ निविदांच्या खर्चात अवघ्या वर्षभरात ३११ कोटींची वाढ झाली आहे. सुधारित दरसूचीनुसार बांधकाम खर्चात ही वाढ झाल्याचे सांगून एमएमआरडीएने या वाढीव खर्चास आपल्या २७६ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे.
एमएमआरडीएने मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा मागविल्या होत्या. त्यात निविदेची मूळ किंमत ७११ कोटी ३४ लाख २२ हजार २५ रुपये नमूद केली होती. यात लघुत्तम निविदा भरणाऱ्या मे. एसईडब्ल्यू -व्हिएसई कंपनीची ९०५ कोटींची निविदा एमएमआरडीएने मंजूर केली आहे. ती मूळ किमतीपेक्षा २७.२२ टक्के जास्त आहे. तर कशेळीच्या कारशेडच्या बांधकामासाठीची मूळ निविदेची किंमत ४७२ कोटी २ लाख रुपये होती. यात लघुत्तम निविदा भरणाऱ्या रित्त्विक प्रोजेक्ट्स यांची ५८९ कोटी ५६ लाख दोन हजार ७८ रुपयांची निविदा एमएमआरडीएने मंजूर केली आहे. ती मूळ किमतीपेक्षा २४.९० टक्के जास्त आहे. मात्र, सुधारित दरसूचीनुसार दोन्ही निविदाकारांचे दर वजा असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.
आकस्मिक खर्च नेमका काेणता?
आश्चर्य म्हणजे यात मोघरपाडा येथील कारशेडच्या बांधकामाच्या कंत्राटात १७ कोटी ३४ लाख ९८ हजार ९८ तर कशेळी कारशेडच्या कंत्राटात १२ कोटी १८ लाख ८२ हजार ५५२ रुपये आकस्मिक खर्च मंजूर केला आहे. मात्र, हा आकस्मिक नेमका काय आहे, याची विस्तारित माहिती कंत्राटे मंजूर करताना दिलेली नाही.
या कामांचा कंत्राटात आहे समावेश
डेपोचे आरसीसी बांधकाम, माती उत्खनन भराव, रस्त्यांची कामे, डेपोसाठी प्री इंजिनीअरिंग कारशेड, मुख्य रस्त्यापासून डेपोपर्यंतचा जोड रस्ता, कर्मचारी निवास स्थाने आणि आकस्मिक खर्च.
माती भराव, उत्खननाच्या कामाचे गौडबंगाल
दोन्ही कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात माती भरावासह उत्खनन करावा लागणार आहे. यानुसार मोघरपाडा कारशेडच्या भराव आणि माती उत्खनन कामासाठी मूळ निविदेत १९३ कोटी ३० लाख ३० हजार ४७६ रुपये खर्च नमूद केला होता. तर सुधारित दरसूचीनुसार तो ३१२ कोटी ४३ लाख ९६ हजार २१९ इतका दाखविला आहे. मात्र या कामासाठी कंत्राटदार मे. एसईडब्ल्यू -व्हिएसई कंपनीने २९१ कोटी ८८ लाख ७६ हजार १९ रुपये खर्च नमूद केला आहे. तर कशेळी कारशेडच्या भराव आणि माती उत्खननाच्या कामासाठी मूळ निविदेत १०५ कोटी ३३ लाख २५ हजार २२१ रुपये खर्च नमूद केला होता. सुधारित दरसूचीनुसार तो १८९ कोटी ३६ लाख १८१ रुपये दाखविला आहे. मात्र, या कामासाठी निविदाकार रित्विक प्रोजेक्ट्स यांनी तो १४९ कोटी ९६ लाख ९१ हजार १०२ रुपये भरला आहे. मूळ निविदेतील इतर सर्व कामांसाठी दोन्ही कंत्राटदारांनी मूळ निविदा आणि सुधारित दरसूचीनुसार अधिक रक्कम भरलेली आहे. परंतु, माती भराव, उत्खननाची कामे मात्र दोघांनी किती तरी कमी दराने भरली आहेत. यामुळे यामागचे गौडबंगाल काय, याची चर्चा रंगली आहे.