कारशेडच्या कंत्राटाआधीच खर्चात ३११ कोटींची वाढ; एमएमआरडीएने दिली मंजुरी

By नारायण जाधव | Published: October 22, 2023 01:08 PM2023-10-22T13:08:18+5:302023-10-22T13:11:04+5:30

ठेकेदारांचे होणार चांगभलं.

311 crore increase in expenditure even before the carshed contract approved by mmrda | कारशेडच्या कंत्राटाआधीच खर्चात ३११ कोटींची वाढ; एमएमआरडीएने दिली मंजुरी

कारशेडच्या कंत्राटाआधीच खर्चात ३११ कोटींची वाढ; एमएमआरडीएने दिली मंजुरी

नारायण जाधव, नवी मुंबई : एमएमआरडीएच्या बहुचर्चित मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ साठीची मोघरपाडा आणि मेट्रो मार्ग क्रमांक ५ च्या कशेळी डेपो बांधकामाचे कंत्राट देण्यापूर्वीच मूळ निविदांच्या खर्चात अवघ्या वर्षभरात ३११ कोटींची वाढ झाली आहे. 

एमएमआरडीएने मोघरपाडा कारशेडच्या बांधकामासाठी ऑक्टोबर २०२२ रोजी निविदा मागविल्या होत्या. त्यात निविदेची मूळ किंमत ७११ कोटी ३४ लाख २२ हजार २५ रुपये नमूद केली होती. त्यात लघुत्तम निविदा भरणाऱ्या मे. एसईडब्ल्यू -व्हीएसई कंपनीची ९०५ कोटींची निविदा मंजूर केली आहे. ती मूळ किमतीपेक्षा २७.२२ टक्के जास्त तर कशेळी कारशेडच्या बांधकामासाठीची मूळ निविदेची किंमत ४७२ कोटी २ लाख रुपये होती. त्यात लघुत्तम निविदा भरणाऱ्या रित्त्विक प्रोजेक्ट्स यांची ५८९ कोटी ५६ लाख दोन हजार ७८ रुपयांची निविदा मंजूर केली आहे. ती मूळ किमतीपेक्षा २४.९० टक्के जास्त आहे.

आकस्मिक खर्च काेणता?

आश्चर्य म्हणजे यात मोघरपाडा येथील कारशेडच्या बांधकामाच्या कंत्राटात १७ कोटी ३४ लाख ९८ हजार ९८, तर कशेळी कारशेडच्या कंत्राटात १२ कोटी १८ लाख ८२ हजार ५५२ रुपये आकस्मिक खर्च मंजूर केला आहे. मात्र, हा आकस्मिक खर्च नेमका काय आहे, याची विस्तारित माहिती कंत्राटे मंजूर करताना दिलेली नाही.

माती भराव, उत्खननाच्या कामाचे गौडबंगाल

दोन्ही कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात माती भरावासह उत्खनन करावे लागणार आहे. यानुसार मोघरपाडा कारशेडच्या भराव आणि माती उत्खनन कामासाठी मूळ निविदेत १९३ कोटी ३० लाख ३० हजार ४७६ रुपये खर्च नमूद केला होता, तर सुधारित दरसूचीनुसार तो ३१२ कोटी ४३ लाख ९६ हजार २१९ इतका दाखविला आहे. मात्र, या कामासाठी कंत्राटदार मे. एसईडब्ल्यू-व्हीएसई कंपनीने २९१ कोटी ८८ लाख ७६ हजार १९ रुपये खर्च नमूद केला आहे तर कशेळी कारशेडच्या भराव आणि माती उत्खननाच्या कामासाठी मूळ निविदेत १०५ कोटी ३३ लाख २५ हजार २२१ रुपये खर्च नमूद केला होता. सुधारित दरसूचीनुसार तो १८९ कोटी ३६ लाख १८१ रुपये दाखविला आहे. मात्र, या कामासाठी निविदाकार रित्विक प्रोजेक्ट्स यांनी तो १४९ कोटी ९६ लाख ९१ हजार १०२ रुपये भरला आहे.

 

Web Title: 311 crore increase in expenditure even before the carshed contract approved by mmrda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.