शहरातील ३१५ इमारती धोकादायक
By admin | Published: June 15, 2017 03:19 AM2017-06-15T03:19:58+5:302017-06-15T03:19:58+5:30
महापालिकेतर्फे शहरातील तीन वर्षांतील ३१५ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये यंदाच्या १४३ नव्या इमारतींचा समावेश असून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेतर्फे शहरातील तीन वर्षांतील ३१५ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये यंदाच्या १४३ नव्या इमारतींचा समावेश असून, सीबीडीतील पोलीस वसाहत, वाशी प्लाझा यासह जय जवान इमारतींचाही त्यात उल्लेख आहे. त्यापैकी १२१ इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदाही धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २०१७/१८ च्या यादीमध्ये १४३ इमारतींचा समावेश आहे, तर मागील तीन वर्षांत पालिकेने एकूण ३१५ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. पडझड झाल्याने राहण्यास धोकादायक असलेल्या या इमारती पावसाळ्यात राहण्यायोग्य नसल्याने त्या तत्काळ खाली करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे करण्यात येतात. त्यानंतरही अनेक शासकीय अथवा खासगी धोकादायक इमारतींचा रहिवासी वापर होत आहे. यंदा प्रसिध्द केलेल्या धोकादायक इमारतींमध्ये अशा १२१ इमारतींचा समावेश आहे. घणसोली वगळता शहरातील इतर सातही नोडमध्ये अशा धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी सर्वाधिक इमारती वाशी विभागातील आहेत. बी टाईप, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाची (ईएसआयसी) वसाहत, एकता व अष्टभुजा अपार्टमेंट, दत्तगुरु नगर , विद्युत वितरण कर्मचारी वसाहत येथील या इमारती आहेत. त्यापैकी राज्य कामगार विमा योजनेच्या कामगारांच्या वसाहतीमधील चार इमारती गतवर्षी देखील धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी अद्यापही कामगारांची पर्यायी सोय न झाल्याने जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यंदा मात्र त्या चार इमारती वगळून उर्वरित नऊ इमारतींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण ईएसआयसी वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिवर्षी धोकादायक घोषित केल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये सिडको निर्मित इमारतींचा सर्वाधिक समावेश असतो. वाशीतील बी टाईप, कोपरखैरणेतील चंद्रलोक सोसायटी, नेरुळमधील एन एल टाईप याठिकाणी सतत पडझड सुरु असते.
इमारती मोडकळीस काढाव्यात अशा सूचना प्रतिवर्षी पालिकेकडून केल्या जातात. परंतु पुनर्बांधणीसाठी गरजेचा असलेला एफएसआयचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळे त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. २०१५ साली पालिकेतर्फे ७४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली होती.
गतवर्षी त्यात वाढ होवून ९८ इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आलेली. यंदा मात्र धोकादायक इमारतींची ही संख्या १४३ पर्यंत पोचली आहे. यानुसार तीन वर्षांत घोषित झालेल्या एकूण ३१५ इमारतींपैकी २७४ इमारतींचा अद्यापही रहिवासी अथवा वाणिज्य वापर होत आहे. त्यापैकी काही इमारतींचे नव्याने स्ट्रक्चर आॅडिट करून त्या राहण्यायोग्य असल्याचे दाखवले जात आहे.
धोकादायक इमारतींचा रहिवासी वापर
पालिकेतर्फे धोकादायक घोषित केल्यानंतरही अनेक इमारतींचा रहिवासी वापर होत आहे, तर इमारत धोकादायक घोषित केल्यानंतर पालिकेचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दुरुस्तीबाबत अनास्था
शहरातील धोकादायक इमारतींचा आकडा प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. धोकादायक घोषित केल्यानंतर सदर इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होत आहे का हे पडताळणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे सदर इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.
यादीबाबत साशंकता
सध्या नवी मुंबईत इमारतींच्या पुनर्वसनाचे वारे जोरात वाहत आहे. परंतु इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता त्या धोकादायक स्थितीत असणे आवश्यक आहे. यामुळे विकासकांची मर्जी राखत काही चांगल्या स्थितीतल्या इमारतींचा देखील धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.