३,१६६ कोटींचा नवा लिंक रोड नवी मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:56 AM2023-09-25T10:56:19+5:302023-09-25T10:57:22+5:30
ठेकेदाराची नियुक्ती, ४ वर्षांत प्रकल्प पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे- बेलापूर रोड, पामबीच आणि सायन- पनवेल या प्रमुख मार्गांवरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुर्भे- खारघरदरम्यान लिंक रोड तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
आकस्मिक खर्चासह ३,१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाशी ते खारघरदरम्यानच्या प्रवासात १५ मिनिटांची बचत होणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी नवी मुंबईतील दळणवळण यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रित करुन विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तुर्भे ते खारघर हा ५.४९ किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग हा याच नियोजनाचा भाग आहे.
कागदावरचा प्रकल्प अखेर मार्गी
विशेष म्हणजे पूर्वी राज्य शासनाने या प्रकल्पाची जबाबदारी रस्ते महामंडळ अर्थात एमएसआरडीसीवर सोपविली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार केला होता. मात्र, कालांतराने रस्ते महामंडळाला हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे माघार घेतली.
मागील पाच वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य शासनाने सिडकोवर टाकली आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडकोने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. त्याला चार बड्या कंपन्यांनी प्रतिसाद देत प्रस्ताव सादर केले होते.
त्यापैकी लघुतम कोट असलेल्या रित्विक एव्हरास्कॉन या संयुक्त भागीदारातील कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या संचालक मंडळानेसुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे रखडलेला तुर्भे-खारघर लिंक रोडचा मार्ग मोकळा झाला.