कोपरीतून ३२ किलो गांजा जप्त, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:04 AM2018-02-01T07:04:33+5:302018-02-01T07:04:57+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते.
नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने कोपरी येथून ३२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे. एक जण कोपरीचा राहणारा असून, उर्वरित दोघे जण कर्नाटकमधून गांजा घेऊन आले होते. हा गांजा ठाण्यात विक्रीसाठी पाठवला जाण्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २९ व ३० जानेवारी रोजी सलग दोन रात्री कोपरी येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. एक व्यक्ती गांजाची विक्रीसाठी त्याठिकाणी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. या प्रकाराची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली असता, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी दोन पथक तयार केले होते. एका पथकाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे तर दुसºया पथकाचे प्रमुख राणी काळे होत्या. या पथकात हवालदार रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, इकबाल शेख, सांगोलकर, कासम पिरजादे, सलीम इनामदार, संजय चौधरी, सचिन भालेराव, राजेश गाढवे, आकाश मुके यांचा समावेश होता.
त्यांनी २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील पुनीत टॉवरलगतच्या परिसरात सापळा रचला होता. त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाºया दस्तगीर शेख (४५) याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो गांजा आढळला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्या अटकेनंतर मंगळवारी चौकशीदरम्यान त्याने इतर दोन साथीदारांची माहिती दिली. ते दोघे जण मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन त्याला मंगळवारीच भेटणार होते, अशी माहिती देखील त्याने दिली. हा गांजा घेऊन तो ठाण्यामध्ये काही ठिकाणी विक्रीसाठी पुरवणार होता. त्यानुसार बाजारे व काळे यांच्या पथकाने पुन्हा दस्तगीर राहत असलेल्या कोपरी परिसरात सापळा रचला होता. शेखने दिलेल्या माहितीनुसार गांजा घेऊन येणारे साथीदार ठरलेल्या ठिकाणी पदपथावर उभे राहणार होते. यानुसार बाजारे यांचे पथक तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवून असतानाच दोघे संशयित आढळून आले.
दत्तात्रेय जाधव (२८) व अंकुश राठोड (२७) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कर्नाटकचे राहणारे असून झडतीमध्ये त्यांच्याकडे ३० किलो ५५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत सुमारे ३२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवरही एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंतची कोठडी मिळाली आहे.
जप्त केलेला गांजा ठाण्यात काही ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जाणार होता, अशी कबुली शेखने दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.