पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली उकळले ३२ लाख; गुन्ह्यात सहभागाची दाखवली भीती
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 20, 2024 07:14 PM2024-05-20T19:14:52+5:302024-05-20T19:14:59+5:30
एनआरआय मधील वृद्ध व्यक्तीसोबत घडला प्रकार
नवी मुंबई : पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगून कारवाईच्या नावाखाली वृद्ध व्यक्तीला धमकावून ३२ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनआरआय परिसरात राहणाऱ्या शरद पाटील (८२) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना एका व्यक्तीने फोन करून पाटील यांचा पुलवामा हल्ल्यात सहभाग निष्पन्न झाले असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांचा ड्रग्स तस्करीत देखील सहभाग असल्याने त्यांच्यावर शासकीय संस्थांमार्फत देशद्रोहाची कारवाई होणार असल्याची भीती दाखवण्यात आली.
त्याद्वारे कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून ३२ लाख रुपये उकलण्यात आले. हि रक्कम संबंधितांच्या सांगण्यावरून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पाठवली आहे. काही दिवसांनी त्यांनी या घटनेबाबत जवळच्या व्यक्तींकडे चर्चा केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.