मुंबईत ४ वर्षांत ३२ हजार बाल मृत्यू
By admin | Published: November 25, 2015 01:23 AM2015-11-25T01:23:24+5:302015-11-25T01:23:24+5:30
संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे.
मीरा रोड : संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये चार वर्षांत ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची माहिती जागतिक नवजात बालक काळजी सप्ताहानिमित्त मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित वात्सल्य उपक्रमप्रसंगी नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. समीर शेख यांनी दिली.
२००८ पासून २०१२ पर्यंत एकट्या मुंबईसारख्या प्रगतिशील शहरात ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावरून मुंबईत दरमहा सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होणे चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जगभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूपैकी २४ टक्के इतके मृत्यूचे प्रमाण भारतातील आहे.
गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण कमी झाले असून क्रमवारीत ६३ व्या स्थानावरून ५३
व्या स्थानावर भारत आल्याचे ते म्हणाले. देशातील २० कोटी जनता आजही उपाशीपोटी जगत आहे. चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात रोज ३ हजार मुलांचा कुपोषण व त्यामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होतो. (प्रतिनिधी)