अलिबागमध्ये ३२४ जातींचे पक्षी
By Admin | Published: November 14, 2015 11:48 PM2015-11-14T23:48:46+5:302015-11-14T23:48:46+5:30
इंडीयन बर्डमॅन म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते. तेथेच त्यांनी पक्षी निरिक्षण, अभ्यास आणि त्यांच्या नोंदी केल्या.
जयंत धुळप, अलिबाग
इंडीयन बर्डमॅन म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते. तेथेच त्यांनी पक्षी निरिक्षण, अभ्यास आणि त्यांच्या नोंदी केल्या. पुढे त्यांच्या पक्षी अभ्यासाची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. सद्यस्थितीत अलिबाग तालुक्यांत पक्षांच्या विविध जातींची संख्या ही इंग्लंडमधील पक्षी जातींपेक्षा अधिक असल्याचे पक्षी नोंदणीअंती निष्पन्न झाले आहे. इंग्लंडमध्ये विविध पक्ष्यांच्या ३०० जाती नोंदीत आहेत तर केवळ अलिबाग तालुक्यांत हीच संख्या ३२४ इतकी असल्याची माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र, अभ्यासक डॉ. वैभव देशमुख यांनी दिली आहे.
आता दरवर्षी होणार पक्षी गणना
भारतातील पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्त रविवार १५ नोव्हेंबर रोजी देशव्यापी ‘डॉ.सलीम अली पक्षी गणना’ करण्याची घोषणा बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने केली आहे. आता दरवर्षी १२ नोव्हेंबर या डॉ. अली यांच्या जन्मदिनास लागून येणाऱ्या रविवारी ही पक्षी गणना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष्यांची छायाचित्रांसह नोंद
त्यांनी अलिबाग तालुक्यांतील या ३२४ जातींच्या पक्षांची छायाचित्रे घेवून त्यांची नोंद जागतिक स्तरावरील पक्षी नोंदणी करणाऱ्या विविध वेबसाईट्सवर केली आहे. त्यांनी केवळ पक्षाची छायाचित्रे घेतली नाहीत तर छायाचित्र घेतल्यावर त्या पक्षाची संपूर्ण माहिती संकलीत करण्याचे काम केले आहे.
हा पक्षी मुळचा कोठला आहे, तो परदेशातून येवून येथे राहीला आहे का, त्याचे वास्तव्य नेमके कोठे
आहे, त्याच्या खाण्याच्या वावरण्याच्या सवयी कोणत्या आहेत अशी सारी माहिती नोंदविली आहे, हा देखील एक विक्रमच म्हटला पाहिजे.
बर्ड काउंट इंडिया या संस्थेच्या सहभागातून पक्षी गणना
रविवारी बर्ड काऊंट इंडीया या संस्थेच्या सहभागातून ‘डॉ.सालीम अली पक्षी गणना’देशभर करण्यात येणार आहे. यामध्ये देखील देशमुख सहभागी होणार असून, ते अलिबाग तालुक्यांतील रामधरणेश्वर परिसरात पक्षी निरिक्षण व गणना करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे संकलन
व विश्लेषण
संपूर्ण एक दिवसाचा हा उपक्र म असून त्यात देशभरातील पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी त्यांच्या जवळच्या ठिकाणी पक्षी निरीक्षण करणार आहेत. त्यांच्या निरिक्षणाच्या नोंदी ते www.ebird.org या संकेतस्थळावर कराणार आहेत. या नोंदींमधून प्राप्त माहितीचे बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे संकलन करून त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.