मेगाब्लॅाक काळात बेलापूर-पनवेलमध्ये एनएमएमटीच्या ३३२ अतिरिक्त फेऱ्या
By नारायण जाधव | Published: September 30, 2023 03:01 PM2023-09-30T15:01:32+5:302023-09-30T15:01:55+5:30
आज मध्यरात्रीपासून लोकलची पनवेलसेवा बंद, ३८ तासांचा ब्लॅाक
नवी मुंबई -मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरीता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान 30/09/2023 रोजी रात्रौ 23.00 पासून ते दिनांक 02/10/2023 रोजी दुपारी 13.00 वाजेपर्यंत 38 तासांचा मेगाब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून वरील मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरीता 28 विशेष बसेसने 232 फेऱ्यांद्वारे बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या विविध मार्गाच्या 46 बसेसच्या 196 फेऱ्या देखिल प्रवाशांना उपलब्ध होतील.
उक्त मेगाब्लॉक कालावधीत खारघर व तळोजा विभागातून विविध मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची गैरसोय होवू नये म्हणून खारघर रेल्वे स्थानकाऐवजी बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणारे मार्ग हे बेलापूर रेल्वे स्थानक येथून सुटतील याची नोंद घ्यावी. या बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशी जनतेने घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने केले आहे.