पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:33 PM2020-09-17T23:33:54+5:302020-09-17T23:34:44+5:30
या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हेत उघड झाले आहे. यासंदर्भात पालिकेने नुकताच सर्व्हे पूर्ण केला असून संबंधितांना नोटीस बजावली आहे. यामध्ये खारघरमध्ये सिडकोने १० वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार, सेलिब्रेशन या गृहसंकल्पातील २९ इमारती धोकादायक आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३, ५४, ५५ आणि ५६ मधील तरतुदीप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्यावर कारवाईसाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका क्षेत्रातील चार प्रभागांत प्रभारी प्रभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे. धोकादायक इमारतींची संख्या मोठी असल्याने अशा इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत.
खारघर शहरात सिडकोने १० वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहसंकल्पातील २९ इमारतींना पालिकेने धोकादायक ठरविले आहे. तत्काळ घरे खाली करण्याचा सूचना करण्यात आल्याने कोरोनाच्या काळात नेमके काय करावे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. तीन दिवसांत या गृहप्रकल्पातील इमारतींना आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना केल्या असून, मुदतवाढ देण्याची विनंती येथील रहिवासी सोसायट्यांनी पालिकेकडे केली आहे.
धोकादायक व अनधिकृत इमारतींना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सर्व कागदपत्रे पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
- धैर्यशील जाधव, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
दहा वर्षांत वास्तुविहार व सेलिब्रेशन या सिडकोने उभारलेल्या गृहप्रकल्पांना धोकादायक ठरविले जात असेल तर घरे खरेदी केलेल्या नागरिकांची ही फसवणूक आहे. निकृष्ट दर्जाचा माल वापरून ही घरे उभारली आहेत, हे सिद्ध होत आहे. - गणेश बनकर, उपाध्यक्ष, मनसे खारघर शहर
पालिकेच्या नोटिशींनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या येथील देखरेख सिडकोच करीत असून सिडकोने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.
- संजना समीर कदम,
स्थानिक नगरसेविका, खारघर प्रभग क्रमांक ६