कळंबोली : महावितरणच्या पनवेल उपविभागीय कार्यालयाने वीजचोरीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत मागील चार महिन्यांत १३० ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून, ३३ लाख ८६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. एप्रिल ते जुलै २०१८ या चार महिन्यांत तीन लाख सात हजार युनिटची चोरी उघडकीस आल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी दिली.महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या अहवालानुसार भिंगारी, तळोजा, नेरा, वावंजे, पारगाव आदी परिसरात महावितरणच्या वीजगळतीत वाढ झाली होती. त्यामुळे महावितरणची यंत्रणा या परिसरातील संशयित ग्राहकांवर नजर ठेवून होती. वीजचोरी करताना संबंधित ग्राहक, वीज मीटरशी छेडछाड करणे, डायरेक्ट वीज घेणे, अशा पद्धतींचा वापर केला जात होता; पण महावितरणच्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे या चोऱ्या पकडल्या जात आहेत.पनवेल विभागाच्या भिंगारी या उपविभागातील तळोजा यागावामध्ये मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात होती. यामध्ये या गावातील गर्भश्रीमंत ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश होता.>वीजचोरी सापडल्यास ग्राहकांना दंडासह रक्कम भरावी लागते. तसेच वीजचोरीच्या स्वरूपानुसार ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येतो. याचबरोबर वीजचोरी करताना अपघात घडून जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी करू नये. या पुढेही वीजचोरी विरोधातील मोहीम अशीच सुरू राहील.- पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण
नवी मुंबईत ३४ लाखांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:45 AM