पनवेलमधील ३४ शाळा धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:53 PM2019-07-18T23:53:25+5:302019-07-18T23:53:34+5:30
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे.
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांचा समावेश आहे. या शाळा अद्याप पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, पालिकेच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेने शाळांकडे दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या घडीला धोकादायक स्थितीतील शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डोंगरीसारख्या घटनेची पुनरावृत्ती पनवेलमध्ये झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत आहे.
पनवेल महापालिकेने संबंधित शाळा हस्तांतराची मागणी जिल्हा परिषदेकडे केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेला शाळा हस्तांतराचा मोबदला हवा असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. मात्र, या सर्व प्रकरणात सर्वसामान्य विद्यार्थी भरडले जात आहेत.
अनेक शाळा धोकादायक स्थितीत असून विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित आहेत. काही शाळांच्या इमारतीने चाळिशी ओलांडली आहे, तर काही १९६० च्या काळातील असून जीर्णावस्थेत आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत काही शाळांची तात्पुरती दुरुस्ती तर काही शाळांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेचे या शाळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५१ पैकी ३४ शाळांमध्ये दुरुस्तीची गरज आहे. शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला शाळांच्या दुरुस्तीचा अहवाल सादर केला आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेला दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही. हस्तांतराच्या कचाट्यात शाळा सापडल्या असून अनेक शाळांमधे पावसामुळे गळती लागली आहे. भिंतींना ओल आले आहे. अशाच स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून छप्पर कोसळणे, भिंत पडणे अशा प्रकारचा धोका के व्हाही निर्माण होऊ शकतो.
पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र लिहिले आहे.
संबंधित शाळांची दुरुस्ती त्वरित हाती घेण्याची विनंती देशमुख यांनी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बुधवारी ्रपनवेल महापालिकेच्या महासभेत पालिका क्षेत्रातील धोकादायक शाळांच्या दुरुस्तीचा विषय समोर आला.
महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या धोकादायक शाळांच्या विषयावर भाजप नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी जिल्हा परिषदेसोबत तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती.
>५१ शाळांपैकी ३४ शाळांच्या दुरुस्तीची गरज
पनवेल महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ५१ शाळांपैकी सध्याच्या घडीला ३४ शाळांमध्ये तत्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. अनेक शाळांना गळती लागली आहे तर काही शाळांचे छप्पर, भिंती पूर्णपणे जीर्ण झाल्या आहे.
.पनवेल महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर अद्याप पालिकेकडे झालेले नाही. शाळांची मालकी जिल्हा परिषदेकडेच आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करून संबंधित शाळांची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीबाबत महापालिका व जिल्हा परिषदेसोबत पत्रव्यवहार केला आहे. सध्या अलिबागमध्ये बैठकीत असल्याने याबाबत फारसे बोलता येणार नाही.
- डी.एन. तेटगुरे,
गटशिक्षण अधिकारी,
पंचायत समिती पनवेल
जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत असेल तर पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तांत्रिक अडचणी येत असतील तर पालिकेने महासभेत शाळा दुरुस्तीचा ठराव घ्यावा. शाळेत जाणारे विद्यार्थी हे पनवेल महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. त्यांच्या जीवास धोका असेल तरी लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- हरेश केणी,
नगरसेवक,
पनवेल महापालिका