अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ३४४ जणांवर गुन्हे दाखल

By Admin | Published: April 12, 2017 03:48 AM2017-04-12T03:48:50+5:302017-04-12T03:48:50+5:30

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीपासून तब्बल ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, मागील दहा दिवसांमध्ये सर्वाधिक

344 accused of unauthorized constructions | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ३४४ जणांवर गुन्हे दाखल

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ३४४ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

- नामदेव मोरे, नवी मुंबई

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. जानेवारीपासून तब्बल ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, मागील दहा दिवसांमध्ये सर्वाधिक १७४ गुन्ह्यांचा समावेश आहे. नोटीस पाठवूनही बांधकाम न थांबविणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व विभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामधील रस्ते, पदपथ व इतर ठिकाणी जागा अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाईचे आदेश दिले आहेत. पालिकेची परवानगी न घेता एमआयडीसी, सिडको, पालिका व इतर सरकारी जागेवर उभारण्यात आलेली बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. शहरात विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांना यापूर्वीच नोटीस दिल्या आहेत. नोटीस देऊनही ज्यांनी अतिक्रमण थांबविले नाही त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. चार दिवसात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल झाले असून, अजून जवळपास ३२ ते ३५ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोपरखैरणे व इतर परिसरातही अशाचप्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. पालिकेच्या या मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपआयुक्त अमरिष पटनिगिरे व त्यांच्या पथकाने प्रत्येक नोडमधील बांधकामांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रामध्ये ३४४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील तब्बल १७४ गुन्हे दहा दिवसांमध्ये दाखल झाले आहेत. पालिका प्रशासनाने पोलीस उपआयुक्तांना पत्र देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून गुन्ह्याचा तपास वेगाने करण्याचे सूचित केले आहे. अनधिकृत बांधकामांना आळा बसावा यासाठी ही कारवाई सुरू केली आहे. शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील बांधकाम त्वरित थांबवून भूखंड जसा होता तसा करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

- कोपरी गाव, सेक्टर २६ ए महापालिका शाळेजवळ १८ मीटर लांब व आठ मीटर रुंद भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे करण्यात येत असल्यामुळे दयाळ अर्जुन भोईर विरोधात ९ एप्रिलला गुन्हा दाखल.
- कोपरी गाव घर क्रमांक १४२४च्या बाजूच्या बेकरी शेजारी नऊ मीटर लांब व नऊ मीटर रुंद भूखंडावर विनापरवाना दोन मजली इमारतीचे बांधकाम केल्यामुळे मनोज मोहन पाटील विरोधात गुन्हा दाखल.
- कोपरी गाव सेक्टर २६ ए भूखंड क्रमांक १४५० व १४५१वर विनापरवाना चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले. जानेवारी २०१७ला नोटीस पाठवूनही बांधकाम थांबविले नसल्याने भारती शिवाजी कोटीयन व विशाल पाटील विरोधात गुन्हा दाखल.
- कोपरखैरणे सेक्टर ५मधील रूम नंबर ३११ मधील शेख फकरुद्दीन मोहम्मद, सेक्टर ६मधील शीतल प्रसाद मौर्य व सेक्टर ७, रूम नंबर ३७३चे पंकज वाडकर यांनी मे २०१५ ते एप्रिल अखेरपर्यंत अनधिकृतपणे बांधकाम केले. यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कोपरखैरणे सेक्टर २२मधील यशोदीप को-आॅपरेटिव्ह सोसायटीमधील १९ सदनिकाधारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली होती; पण नोटीसचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवल्यामुळे सदनिकाधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
- कोपरी गाव पालिका शाळेजवळ ८.४० मीटर लांब व ७.९० मीटर रुंद भूखंडावर दोन मजली बांधकाम केल्याप्रकरणी संतोष गोपीनाथ पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कोपरी गावातील घर क्रमांक १६६८जवळ रवी पाटील यांनी विनापरवाना दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सप्टेंबर २०१६मध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालिकेने नोटीस दिली होती; पण बांधकाम न थांबविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- कोपरी गाव कुलदैवत मैदानाजवळ सात मीटर लांब व रुंद भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकरणी नारायण पदाजी भोईर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- कोपरी गावाजवळील राममंदिराजवळ चार मजली इमारतीचे काम सुरू असल्याने नोव्हेंबर २०१६मध्ये निदर्शनास आले. याप्रकरणी कृष्णा भोईर व प्रदीप भोईर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 344 accused of unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.