राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब सह ३४८ अ नवी मुंबई विमानतळास जोडणार; जेएनपीएला होणार लाभ

By नारायण जाधव | Published: May 9, 2023 03:13 PM2023-05-09T15:13:01+5:302023-05-09T15:13:09+5:30

१.४१ एकर वनजमीन देण्यास मंजुरी

348 A will connect Navi Mumbai Airport with National Highway No. 4 B; JNPA will benefit | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब सह ३४८ अ नवी मुंबई विमानतळास जोडणार; जेएनपीएला होणार लाभ

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब सह ३४८ अ नवी मुंबई विमानतळास जोडणार; जेएनपीएला होणार लाभ

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जाेमाने सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२४ पर्यंत येथून विमानाचे उड्डाण करण्याचा संकल्प विकासक कंपनी आणि सिडकोने सोडला आहे. त्यादृष्टीने या विमानतळास जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केवळ सिडकोच नव्हे तर एमएसआरडीसीसह राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणानेही कंबर कसली आहे. याच अंतर्गत आता या प्राधिकरणाच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ अ हे दोन महामार्ग विमानतळास जोडण्यात येणार आहेत. यानुसार दोन महामार्गांना जोडण्यासाठी १.४१ एकर वनजमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनविभागाने सोमवारी मंजुरी दिली आहे.

राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या मुंबई-जेएनपीटी रोड कंपनीने याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडे सादर करून ०.५६६९ हेक्टर अर्थात एक एकर ४१ गुंठे वनजमीन मागितली होती. कंपनीच्या प्रस्तावानुसार महामार्गांना जोडणारे हे दोन जोड रस्ते सहा ते आठ लेनचे असणार आहेत.

वहाळची आहे वनजमीन
पनवेल तालुक्यात वहाळच्या गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक ४२७/१ वरील ही वनजमीन आहे. त्यातील एक एकर ४१ गुंठे वनजमीन आता विमानतळास जोडणाऱ्या रस्त्यांकरिता वळती करण्यात येणार आहेत. यानंतर सीआरझेड आणि वनमंत्रालयाची परवानगी घेऊन या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येईल. वनजमीन मिळाल्याने नवी मुंबई विमानतळास जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.

जेएनपीएतील वाहतूक होणार सुसाट
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ अ हे दोन महामार्ग नवी मुंबईला जोडण्या येणार असल्याने त्याचा लाभ केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर जेएनपीए बंदरातील मालवाहतुकीसही मोठा फायदा होणार आहे. या विमानतळावरून कार्गो वाहतूकही होणार आहे. त्यामुळे जेएनपीएत देश-विदेशातून कंटेनरमधून येणाऱ्या कच्च्या मालाची विमानाद्वारे थेट देशातील विविध शहरांसह विदेशातही वाहतूक सुसाट करणे सोपे होणार आहे.

सीआरझेडनेही दिली होती चार रस्त्यांना मुदतवाढ
नवी मुंबई विमानतळास जोडण्यासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या चार रस्त्यांसाठी सीआरझेडने गेल्याच पंधरवड्यात मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात आम्र जंक्शन, खांदेश्वर रेल्वे स्थानकासह दोन अंतर्गत मार्गिकांचा समावेश आहे.

Web Title: 348 A will connect Navi Mumbai Airport with National Highway No. 4 B; JNPA will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.