लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ३० दिवसामध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून उरण मधील महिलेची ३५ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधीतांनी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरण परिसरामध्ये राहणाऱ्या निर्मला म्हात्रे यांना त्यांच्या ओळखीच्या महिलेने त्यांच्याकडील योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याची विनंती केली होती. ३० दिवसांमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखविले होते. अनेक नागरिकांना पेसे दुप्पट करून दिलेले असल्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून निर्मला यांनी दागिने घाण ठेवून २५ लाख रूपयांची गुंतवणूक केली हाेती. भावाकडून घरबांधणीसाठी घेतलेले ७ लाख रुपये, बचत केलेले अडीच लाख रुपये व पीएफ मधून ५० हजार रुपये काढून १० लाख असे एकूण ३५ लाख रुपयांची गुंतवणूक २ ते १४ फेब्रुवारी दरम्यान केली होती. गुंतवणुकीला ३० दिवस पूर्ण झाल्यानंतरही पैसे परत न मिळाल्यामुळे फोन केला असता संबंधीत महिलेचा फाेन बंद होता. घरी जावून चौकशी केली असता तेथेही नसल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता सुप्रिया व तिच्या साथीदारांनी अनेकांना पैसे गुुंतविण्यास सांगून फसविले असल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून या तक्रारीच्या आधारे सुप्रिया पाटील, गणनाथ ठाकूर, सागर पाटील, गणेश गावंड, नवेश गावंड, प्रणय ठाकूर, हितेश कडू, हितेश पाटील, धुरवा पाटील, देवेंद्र ठाकूर व रोहन पोळेकर या संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधीतांनी अजून काही जणांना फसविले असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.