नवी मुंबई : अज्ञात तिघांनी सीबीडीतील सोनारासह दिल्लीतल्या एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सोनाराचे ३५ लाख रुपये किमतीचे सोने त्यांनी चलाखीने हडपले आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सीबीडी येथील मयुरा ज्वेलर्स चालक सचिन जैन यांच्यासोबत तसेच दिल्लीतील नवदीप सिंग, आदर्श लूमर व सिमरणजीत सिंग यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अज्ञात तीन व्यक्तींनी जैन यांच्या दुकानात येऊन त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी दागिने व सोन्याचे शिक्के हवे असल्याचे सांगितले होते. यावेळी सोन्याच्या बिलाची रक्कम थेट खात्यावर पाठवतो असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार काही दिवसांनी दुकानात आलेल्या व्यक्तीने जैन यांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवून टप्प्या टप्प्याने त्यांच्याकडून ३५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व शिक्के नेले होते. त्यानंतर काही वेळातच जैन यांच्या खात्यावर आलेली रक्कम एका गुन्ह्यातुन आली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्याठिकाणी नवदीप सिंग, आदर्श लूमर व सिमरणजित सिंग यांची भेट झाली. अज्ञात तिघांनी त्यांना कॅनडा येथे एक वर्क ऑर्डर मिळवून देतो असे सांगून त्यासाठी लागणारी रक्कम जैन यांच्या खात्यावर भरण्यास सांगितले होते. तर सदर रक्कम सोन्याच्या व्यवहाराची असल्याचे भासवून जैन यांच्याकडून सोने नेले होते. त्यावरून एकाच टोळीने दोघांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच त्यांनी झालेल्या फसवणूक प्रकरणी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.