३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:00 AM2018-08-16T05:00:27+5:302018-08-16T05:00:47+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही.
- अनंत पाटील
नवी मुंबई - स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील तब्बल ३५ हजार कुटुंबीयांकडे गॅस सिलिंडर नसल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभही या नागरिकांना मिळालेला नाही. या नागरिकांना इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. वाशी शिधावाटप कार्यालयामधील अपुरा कर्मचारी वर्ग व प्रशासकीय उदासीनतेमुळे १०० टक्के नागरिकांपर्यंत गॅस पुरविण्यात अपयश आले आहे.
घणसोली ते बेलापूरपर्यंत शासनमान्य स्वस्त धान्य शिधावाटप दुकानांची एकूण संख्या ९४ असून, त्यापैकी नऊ दुकाने विविध कारणांमुळे निलंबित आहेत. मात्र, उर्वरित ८५ शिधावाटप दुकानांचा कारभार वाशी पोलीस ठाण्यासमोरील वाशी शिधावाटप कार्यालयामार्फत चालतो. या कार्यालयात एकूण १ लाख ४४ हजार ३१९ शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून, त्यापैकी ३५ हजार कार्डधारकांकडे गॅस सिलिंडर जोडणी नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वल योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. नवी मुंबईसारख्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहरामध्येही
हजारो कुटुंबीयांकडे गॅसजोडणी नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाºया कार्डधारकांना दोन रुपये किलो दराने गहू, तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. गॅसजोडणी नसल्यामुळे इंधन म्हणून रॉकेलचा वापर करावा लागत आहे. सद्यस्थितीत वाशी कार्यालयांतर्गत येणाºया ८५ दुकानांना दरमहा ७० हजार लीटर रॉकेलचा पुरवठा केला जातो.
रॉकेलसाठी बोगस शिधापत्रिका तयार केल्या आहेत का, याची छाननी करण्याची मागणीही केली जात आहे. शिधावाटप कार्यालयात पुरेसे कर्मचारी नाहीत. ८५ दुकानांसाठी केवळ आठ निरीक्षक आहेत. शिपाई फक्त एकच असल्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब होत आहे. आठ निरीक्षकांसाठी किमान आठ संगणकांची गरज आहे, परंतु चार संगणकांवर काम केले जात आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांना तासन्तास ताटकळत कधी काम होईल, म्हणून उभे राहावे लागत आहे. गतमहिन्यात शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून प्रत्येक दुकानात २५० किलो तूरडाळ आली होती, परंतु त्याचे योग्य प्रमाणात वितरण झालेले नाही.
‘दीड लाख शिधापत्रिकाधारकांची संख्या असलेल्या वाशी ४१ एफ अंतर्गत शिधावाटप कार्यालयात शिपाई, निरीक्षक, लिपिक वाढविणे आवश्यक आहे. शिधापत्रिकाधारकांना विविध कामांसाठी आमच्या वाशी कार्यालयाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाते, पण अपुºया कर्मचारी संख्येमुळे काही वेळा विलंब होतो. हे खरे असले, तरी नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.’
- एकनाथ पवार, शिधावाटप नियंत्रक,
अधिकारी ४१ फ, वाशी.