सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:59 IST2025-01-16T12:59:25+5:302025-01-16T12:59:32+5:30
विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले.

सिडकोच्या ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, भत्ते नाकारल्याने बेलापूरच्या अर्बन हाट येथे निदर्शने
पनवेल : सिडकोच्या निरनिराळ्या विभागांतील लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई तसेच अग्निशामन दल विभागात ३५० कर्मचारी मागील १४ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी हे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त असून, भत्ते नाकारल्याने त्यांनी मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून गुरुवारी बेलापूरच्या अर्बन हाट येथे आंदोलन केले.
विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले आले. किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या तरतुदीप्रमाणे वेतन, भत्ते व इतर सेवासवलती देणे बंधनकारक असताना, या कर्मचाऱ्यांना दुकाने व व्यापारी आस्थापना या उद्योगांतील कामगारांप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
भविष्यनिर्वाह निधीचा केला अपहार
कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करून ठेकेदाराने ही रक्कम भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात जमा केलेली नाही. अशा प्रकारे गेले १८ महिने या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली लाखो रुपयांची रक्कम या ठेकेदाराने भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात भरली नसून, या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.