खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा
By वैभव गायकर | Published: November 13, 2023 05:27 PM2023-11-13T17:27:31+5:302023-11-13T17:29:46+5:30
दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.
पनवेल : खारघरमध्ये दिया फोर युनिटी या एक दिवा एकतेच्या उपक्रमा अंतर्गत सुमारे एक लाख पणत्यांच्या साहाय्याने 350 वा राज्यभिषेक सोहळा रोषणाईद्वारे साकारण्यात आला. दि.12 रोजी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खारघर मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये हा दीपोत्सव पार पडला.
दिया फोर युनिटीचे अध्यक्ष आदित्य कांबळे, उपाध्यक्ष कुणाल महाडीक, श्रीराम शिंदे यांच्या पुढाकाराने हा दीपोत्सव संपन्न झाला. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम खारघर शहरात राबविण्यात येतो.पहिल्या वर्षी 15 हजार दिव्यांनी अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती केली. दुसऱ्या वर्षी आझादी का अमृत महोत्सव संकल्पना घेऊन 75 हजार दिव्यांनी अखंड भारताची प्रतिकृती तयार केली.या वर्षी शिवराज्यभिषेक 350 सोहळा वर्ष संकल्पना घेऊन दीपोत्सव साजरा केला गेला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा आपली आवर्जुन उपस्थिती लावली.एक हजारांपेक्षा जास्त नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झाले होते.या राममंदिराची छबी टिपण्यासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.