एनएमएमटीच्या उत्पन्नात ३६ लाख वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:57 PM2019-01-16T23:57:13+5:302019-01-16T23:57:23+5:30
बेस्टच्या संपाचा फायदा : आठ दिवसांमध्ये ३ कोटी २४ लाख रुपये महसूल जमा
नवी मुंबई : बेस्टचा संप नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)च्या पथ्यावर पडला आहे. आठ दिवसांमध्ये ३ कोटी २४ लाख रुपयांचा महसूल तिकीटविक्रीतून प्राप्त झाला असून, सरासरीपेक्षा तब्बल ३६ लाख रुपये जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मुंबईसह नवी मुंबईमध्येही बेस्ट बसेसचे प्रमाण जास्त आहे. संपामुळे या परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. रेल्वे, रिक्षा व टॅक्सीबरोबर एनएमएमटी बसनेही संपाच्या काळात प्रवाशांना आधार दिला. एनएमएमटीच्या मुंबईमध्ये १४ मार्गावर ११४ बसेस सुरू असून, रोज १२५ फेऱ्या होत असतात. संप काळात या मार्गावर ४० बसेस वाढविण्यात आल्या होत्या. नवी मुंबई, पनवेलमधील उपक्रमाच्या बसेसही वेळेत धावतील याची काळजी घेतली जात होती. याचा फायदा उपक्रमाला झाला आहे. प्रतिदिन तिकीटविक्रीतून सरासरी ३६ लाख रुपये उत्पन्न होत होते. संप काळात शनिवार व रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीचा अपवाद वगळता रोज ४१ लाख पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. १४ जानेवारीला सर्वाधिक ४३ लाख ५८ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. एक आठवड्यामध्ये सर्वप्रथमच ३ कोटी २४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
एनएमएमटी प्रशासनाने बेस्टच्या संप काळात प्रवाशांचे हित लक्षात घेऊन आवश्यक त्या मार्गावर बससेवा वाढविण्यात आली होती. यामध्ये उत्पन्न वाढविण्यापेक्षा प्रवाशांची गैरसोय दूर करणे हा प्रमुख हेतू असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाने दिली आहे.
कर्मचाºयांनीही या काळात चांगले काम केल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
नवी मुंबईसह मुंबईमधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वांनी चांगले सहकार्य केल्यामुळे उपक्रमाला या आठ दिवसांमध्ये ३६ लाखांपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे.
- विसाजी लोके, परिवहन सदस्य, शिवसेना
बेस्ट संपाच्या काळात मुंबईमधील व घणसोली ते वाशी दरम्यान बसफेºया वाढविल्या होत्या. या काळात सरासरी ४१० बसेस रोडवर धावत होत्या. यामुळे रोजच्या उत्पन्नामध्ये सरासरी पाच लाख रुपयांची वाढ झाली आहे.
- शिरीष आरदवाड,
परिवहन व्यवस्थापक,
एनएमएमटी