काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले, काश्मीर वरून विशेष विमानाची व्यवस्था
By वैभव गायकर | Updated: April 24, 2025 23:04 IST2025-04-24T23:04:30+5:302025-04-24T23:04:50+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांना मुंबई मध्ये आणण्यात आले.

काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले, काश्मीर वरून विशेष विमानाची व्यवस्था
पनवेल : पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल मधील पर्यटक देखील शिकार झाले.दोन जण जखमी झाले तर एक जणाला दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले.यापैकीच काही पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी निसर्ग टूर्सच्या 37 पर्यटकांना दि.24 रोजी मुंबई येथे आणण्यात आले.त्यानंतर विमातळावरून बसच्या साहाय्याने हे पर्यटक पनवेलला दाखल झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने त्यांना मुंबई मध्ये आणण्यात आले. यावेळी आ. विक्रांत पाटील हे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या सतत संपर्कात होते. पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर देखील वेळोवेळी पर्यटक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. निसर्ग टूर्सचे एकूण 39 पर्यटक काश्मिर मध्ये होते. त्यापैकी जखमी असलेले सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोघेही अद्याप काश्मीर मधील सुरक्षा दलाच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी दिली.गुरुवारी रात्री हे पर्यटक पनवेल मध्ये आपल्या घरी परतले.यावेळी संबंधित पर्यटक प्रचंड तणावात होते. अनेकांना आपल्या कुटुंबियांना भेटल्याने आश्रु अनावर झाले.यावेळी आ.विक्रांत पाटील यांच्या माध्यमातुन मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद आहे. केंद्रित मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष विमान आयोजित करून पनवेलकराना सुखरूप घरी आणल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- विक्रांत पाटील (आमदार)