नवी मुंबई : गत आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाची रक्कम १०० टक्के खर्च करण्यात कोकण विभागाला यश आले आहे. कोकण विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण, अनुसुचित जाती घटक कार्यक्रम, आदिवासी घटक कार्यक्रम अशा विविध उपक्रमासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ३८७१.०४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या उपलब्ध निधीपैकी ३८६७.०४ कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचे संबधित विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण योजनेसाठी कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांसाठी एकूण ३८७४.०४ कोटी रुपये निधी देण्यात आला होता. कोकण विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त होणारा निधी १०० टक्के खर्च झाला पाहिजे यासाठी कोकण विभागाचे माजी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. तसेच तो व्यपगत होणार नाही यासाठी विशेष नियोजन करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेसोठी सात जिल्ह्यांसाठी प्राप्त ३१६५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास संबधित विभागाला यश आले आहे.
अनुसूचित जाती घटक कार्यक्रम योजनेसाठी महसूली कोकण विभागासाठी २७४ कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रम योजनेसाठी ४३२.४ कोटी रुपये मिळाले हाेते. या दोन्ही उपक्रमावरील निधीचा शंभर टक्के खर्च केल्याचे संबधित विभागाने स्पष्ट केले आहे.