कोपरखैरणेत ४ गुन्हेगार, बांगलादेशी महिलेला बेड्या, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये केली धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:27 PM2024-03-04T14:27:42+5:302024-03-04T14:31:44+5:30
वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या.
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली आहे.
कोपरखैरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडतात. गल्लीबोळात टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांची आपसात हाणामारी होत असते. यापैकी स्वत:ला भाई होऊ पाहणारे, चोऱ्या-घरफोड्या करणाऱ्यांना प्रतिबंध लवाण्यासाठी पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री कोपरखैरणे पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या १४ तुकड्या पुरवण्यात आल्या. यातील २५ अधिकारी, १४० कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे, घणसोली परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला असता चार सराईत गुन्हेगार व एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागली.
दाेन जणांनी काढला पळ
सलीम इमाम खान (२८), रिझवान सादिक कुरेशी (३२), अज्जू फ्रान्सिस (२७), साहिल अन्सारी (२२) व पॉपी मुल्ला (२०) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी तिघे खैरणे तर एक बोनकोडेचा राहणारा आहे. सलीम याच्यावर घरफोडीचे १७ गुन्हे दाखल आहेत. मात्र अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. तर साहिल याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाइल मिळून आले. खैरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला ही बांगलादेशी महिला मिळून आली असून तिचे दोन नातेवाईक अंधारात पळून गेले.
अधिकारी जखमी
कोपरखैरणे सेक्टर ५ येथील मार्गाने वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पारसिक बँकेसमोर दुचाकीस्वार तरुणावर संशय आला. पाेलिसांना पाहून त्याने पळ काढला. औदुंबर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत ते जखमी झाले आणि संशयित आराेपीने पळ काढला.