बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटले सिडकोचे ४ कोटी

By कमलाकर कांबळे | Published: April 12, 2023 04:10 PM2023-04-12T16:10:13+5:302023-04-12T16:11:26+5:30

दक्षता विभागाकडून चौकशी सुरू : सहा वर्षापासून सुरू होता लुटीचा प्रकार

4 crores of cidco in the name of bogus employees | बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटले सिडकोचे ४ कोटी

बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटले सिडकोचे ४ कोटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोत यापूर्वी अनेक घोटाळे झाले आहेत. त्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या आहेत. परंतु, सिडकोत आता एक वेगळाच घोटाळा समोर आला आहे. आस्थापनेवर करार पद्धतीवर नियुक्तीच्या नावाने सिडकोत बोगस नोकरभरती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे २०१७ पासून हा प्रकार सुरू असून त्या माध्यमातून वेतनाच्या नावाखाली सिडकोच्या तिजोरीवर जवळपास ४ कोटींचा डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध विभागांच्या माध्यमातून सिडकोचा कारभार चालतो. त्यासाठी करार पद्धतीवर समन्वयक किंवा सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाते. कार्मिक अर्थात आस्थापणा विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे अशा करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची जबाबदारी सुद्धा कार्मिक विभागाची असते. संबधित कर्मचारी कार्यरत असलेल्या विभागप्रमुखाच्या स्वाक्षरीनंतर कार्मिक विभागाकडून लेखा विभागाकडे वेतनासाठी प्रस्ताव पाठविला जातो. मात्र, मागील सहा वर्षांपासून विभागप्रमुखांच्या खोट्या स्वाक्षरी करून १४ बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन आणि इतर भत्ते मिळून जवळपास ४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

संजय मुखर्जींनी घेतली दखल

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्य दक्षता विभागाला दिले आहेत. त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार संशयाच्या कक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व जबाब नोंदवून घेतले जात आहेत. सध्या १४ बोगस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता मेंगडे यांनी व्यक्त केली आहे.

एका तक्रारीमुळे फुटली वाचा

चेतन बावत यांनी आठ दिवसांपूर्वी सिडकोच्या लेखा विभागात तक्रार केली होती. मी सिडकोचा कर्मचारी नाही. तरीही माझ्या नावे मोठ्या प्रमाणात वेतनाची रक्कम बॅंकेत जमा होत आहे. त्यामुळे मला प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावली आहे. मुळात माझ्या कोणत्या बॅंक खात्यात वेतन जमा केले जातेय, असा प्रश्न त्यांनी सिडकोच्या लेखा विभागाकडे मागितली होती. त्याअधारे कार्मिक आणि लेखा विभागाने तपासणी केल्यानंतर या नावाची कोणतीच व्यक्ती सिडकोच्या अस्थावनेवर कार्यरत नसल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दक्षता विभागाला दिले आहेत.

बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन लाटण्याचा प्रकार धक्कादायक आहे. मागील सहा वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. सखोल चौकशी करून संबधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दक्षता विभागाला दिले आहेत. - डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: 4 crores of cidco in the name of bogus employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.