कळंबोलीतील ६० कुटुंबे भीतीच्या छायेत; जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:43 AM2019-08-10T00:43:45+5:302019-08-10T00:43:52+5:30
३० तासांनंतरही हालचाली नाहीत; इमारत जमीनदोस्त करण्याच्या खर्चावरून वाद
कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर ३ ई येथील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने इमारतीच्या मागील तसेच बाजूला असलेली जवळपास ६० घरे पनवेल महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ खाली केलीत. या वेळी एका दिवसात उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले; परंतु शुक्रवारचा पूर्ण दिवस गेला तरी या बाबत काहीच हालचाली होत नसल्याने रहिवाशांमधून रोष व्यक्त होत आहे.
कळंबोली सिडको वसाहतीतील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला. या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे खाली करण्यास सांगितले. त्यानुसार सदनिकाधारकांनी घरे खाली केली. शुक्रवारी सकाळी इमारत पाडण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी नातेवाइकांकडे आसरा घेतल्याचे विलास माने या रहिवाशांनी सांगितले. मात्र, शुक्रवारी संध्याकाळचे ६ वाजेपर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्याने कामात अडथळा आला नसता. मात्र, महापालिका व रिधिमा सोसायटीधारक एकमेकांकडे बोट दाखवत इमारत पाडण्याचा खर्च करायचा कोणी? यावर चर्चा करण्यात दोन दिवस गेले.
इमारत पुनर्बांधणीसाठी सिडकोने आम्हाला परवानगी दिलेली नाही. २०११ पासून सदनिकाधारकांनी देखभालीसाठी खर्च जमा करणे बंद केले आहे. तेव्हा इमारत महापालिकेने जमीनदोस्त करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी होती. तसे महापालिकेने इमारत पाडण्यास होकारही दिला; पण खर्च मोठ्या प्रमाणात येईल. येणारा खर्च रिधिमा सोसायटीने महापालिकेला भरला तरच पुनर्बांधणीसाठी परवानगी मिळेल, असा उपायुक्त यांनी सोसायटीधारकांसमोर खुलासा केल्याचे समजते. रिधिमा सोसायटीच्या बाजूला असलेली कृषिधन इमारत तसेच पाठीमागील सिडकोची ई १ टाइपमध्ये २०० रहिवासी वास्तव्यास आहेत. आम्ही किती दिवस घराबाहेर राहायचे, असा प्रश्न रहिवासी विचारात आहेत.
ऐतिहासिक बापट वाडा मोजतोय अखेरची घटका
पनवेल शहरातील सुमारे २७५ वर्षांची साक्ष देणारा ऐतिहासिक बापट वाडा सध्याच्या घडीला अखेरची घटका मोजत आहे. शुक्रवारी बापट वाड्याचा काही भाग कोसळल्याचे पालिकेने गांभीर्य लक्षात घेता धोकादायक भाग जमीनदोस्त केला. वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेलची ओळख होती. त्यापैकीच एक बापट वाडा असून दरवर्षी याठिकाणी कृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पनवेल महानगर पालिकेने संबंधित बापट वाड्याला धोकादायक घोषित केले आहे. सध्याच्या घडीला वाड्यात काही रहिवासी वास्तव्यास आहेत. पालिकेचे ड प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी धोकादायक असलेल्या बापट वाड्याला तत्काळ नव्याने नोटीस बजावली आहे.
या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. पनवेल शहरात सध्याच्या घडीला ६० धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे, २० ते २५ धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. रहिवासी व बांधकाम व्यावसायिकांचा वादामुळे अनेक जण घरे रिकामी करत नाहीत.
मोडकळीस आलेली रिधिमा इमारत सोसायटीधारकांकडूनच पाडण्यात येणार आहे. या बाबत सदनिकाधारकांशी चर्चा केली आहे. मशिन तसेच येणारा खर्च सोसायटीकडून केला जाणार आहे. यासाठी सुमारे साडेपाच लाख खर्च अपेक्षित आहे. मशिन आल्यानंतर पाडण्यास सुरुवात केली जाईल.
- कैलास सिंग, रहिवासी, रिधिमा सोसायटी