नवी मुंबई : सिडकोच्या घरांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. सिडकोने या घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी सध्या खारघर परिसरातील घरांना अधिक पसंती मिळत आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज करणाऱ्या ग्राहकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांत तब्बल चार हजार नवीन अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
येत्या दोन-तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांची योजना जाहीर केली. त्यासाठी ११ ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ६३ हजार ७२७ अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास चार हजार अर्ज हे फक्त दिवाळीच्या तीन दिवसांत प्राप्त झाले आहेत.
इतकेच नव्हे तर ऑनलाइन अर्ज केलेल्या ९ हजार १२४ अर्जदारांनी नोंदणी शुल्क अदा केले आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांत अर्जांचा आकडा लाखापर्यंत जाईल, असा विश्वासही सिडकोच्या संबंधित विभागाला वाटत आहे.
‘या’ ठिकाणांना ग्राहकांची पसंतीसिडकोची ही घरे खारकोपर, बामणडोंगरी तसेच तळोजा, खारघर, मानसरोवर आणि खांदेश्वर या भागात आहेत. त्यापैकी खारघरमध्ये विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या तीन गृहप्रकल्पांतील घरांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.