भूखंडाचा ४० वाणिज्यिक वापर; नियोजित हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या खर्चाची अशी तरतूद
By नारायण जाधव | Published: August 17, 2023 03:54 PM2023-08-17T15:54:23+5:302023-08-17T15:55:42+5:30
सिडकोचा नगरविकासला प्रस्ताव : मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा
नारायण जाधव
नवी मुंबई : महापालिकेच्या बेलापूर येथील साडेआठ एकर जागेवर होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेजच्या प्रकियेला गती मिळाली आहे. सिडकोने दिलेला भूखंड पालिकेने विकत घेतला आहे. याबाबत आता पुढे जाऊन रुग्णालय व मेडिकल कॉलेजसाठी ४० टक्के वाणिज्यिक वापराच्या परवानगीसाठी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे या प्रयत्नात आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने नगरविकास खात्याला पाठविला आहे.
म्हात्रे यांच्याकडूनही याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर १५ ए, भूखंड क्र. चारबाबत नवी मुंबई महापालिका सुपर स्पेशालिटी व मेडिकल कॉलेजसाठी सिडकोसोबत करारनामा करणार आहे. पालिकेने याबाबत सिडकोला पत्र देऊन एकूण भूखंडाचे ४० टक्के क्षेत्र वाणिज्यिक वापरासाठी द्यावे, अशी मागणी केली आहे. सिडकोने याआधी एकूण १५ टक्के वाणिज्यिक वापरासाठी पालिकेला परवानगी देण्याचे ठरवले होते. मात्र, महापालिकेने ४० टक्क्यांची मागणी केल्याने सिडकोने याबाबत ३ ऑगस्ट रोजी महापालिकेचे संबंधित अधिकारी- महामंडळाचे नियोजन, वसाहत- सामाजिक सेवा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या भूखंडामध्ये भाडेपट्टा आकारून १५ टक्केऐवजी ४० टक्के वाणिज्य वापर अनुज्ञेय होण्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर सिडकोने नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केला आहे.
म्हणून केली वाणिज्यिक वापराची मागणी
आ. म्हात्रे यांनी सांगितले की, रुग्णालय व मेडिकल कॉलेज या प्रयोजनासाठी सिडकोने साडेआठ एकराचा भूखंड पालिकेला दिला आहे. तो घेताना शहरात पालिकेची अनेक रुग्णालये असताना आणखी रुग्णालयाची गरज का? खर्च पालिकेला परवडेल का? आर्थिक भाराचे काय, असे अनेक प्रश्न करून मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. मात्र, त्यानुसार पालिकेला नियोजित रुग्णालय चालवणे जड जाऊ नये, म्हणून ४० टक्के वाणिज्यिक वापराची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे केली आहे.