नवी मुंबई : कांदा पीक उशिरा येण्याच्या शक्यतेमुळे दरवाढ होणार भीतीने केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. याविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेल्या नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनेक बाजार समित्यात तो बंद झालाही आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांची शिखर समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत.
या संदर्भात आज (सोमवारी) चार वाजता व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. याठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारपेठेचे संचालक अशोक वाळुंज यांनी लोकमतला सांगितले. निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा थेट कांदा निर्यातीवर परिणाम होऊन परदेशात कांद्याची निर्यात कमी होईल, परिणामी राज्यात कांद्याचे दर घसरतील, असा केंद्र सरकारचा होरा आहे. मात्र, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय आततायी असून कोणताही अभ्यास सरकारने केलेला नाही. मुळात राज्यातील बाजार समित्यांत जो कांदा येत आहे, तो अनेक ठिकाणी भिजलेला येत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अशोक वाळुंज यांनी सांगितले की, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज १२५ ते १३० गाड्या कांदा येत आहे. त्यातील बहुतांश कांदा भिजलेला आहे. जवळपास ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा येत आहे. आता निर्यात शुल्क वाढविल्याने त्याचा काहीही परिणाम भारतीय बाजार पेठेवर होणार नाही. उलट शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. यामुळेच नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
मुंबईत पाठिंबा पण लिलाव दोन दिवसानंतर होणार बंदमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यापारीही या लिलाव बंद आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. यासाठी आम्ही आज संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावली आहे. मात्र, आमचा लिलाव दोन दिवस उशिराने बंद होईल. कारण आमच्या बाजार पेठेत बटाट्याचे अनेक गाड्या उत्तरप्रदेश-बिहार मधून निघालेल्या आहेत. त्या वाटेत आहेत. त्या मुंबईत आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुंबईतह दोन दिवसानंतर आम्ही कांदा लिलाव बंद करू, असे अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले.