विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:11 PM2019-01-29T23:11:08+5:302019-01-29T23:11:44+5:30
सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक महिन्यापासून हापूसची आवक होऊ लागली आहे. यामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. हापूसचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यावर्षी मार्चमध्ये नियमित व मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बाजार समितीमध्ये प्रथमच जानेवारीमध्ये नियमित आंब्याची आकव होऊ लागली आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच वर्षाच्या सुरुवातीला ४०० पेट्यांची आवक आली आहे. देवगड व इतर ठिकाणावरून आंबा विक्रीसाठी येत आहे. वास्तविक आंबा हंगाम फेब्रुवारी अखेरीस व मार्चमध्ये सुरू होत असतो; परंतु काही ठिकाणी हंगामापूर्वीच आंबे तयार होतात. या वर्षी हे प्रमाण जास्त आहे. मार्केटमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या मालामधील ३० ते ४० टक्के माल खराब होऊ लागला आहे. एक हजार रुपये डझन दराने या आंब्याची विक्री होत आहे. नरीमन पॉइंट व इतर श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये याची विक्री होत आहे.
केरळ व कर्नाटकमधूनही हापूसची आवक सुरू झाली आहे. बाजारभाव जास्त असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या वर्षी सर्वत्र उत्पादन चांगले असून, मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होऊन आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.
जानेवारीच्या सुरुवातीपासून आंबा विक्रीसाठी येत आहे. हंगामपूर्व काही ठिकाणी आंबा तयार होतो, असा आंबा सद्यस्थितीमध्ये विक्रीसाठी येत असून त्यामध्ये काही माल खराब होत आहे.
- महेश गावडे,
फळ व्यापारी, एपीएमसी