१३ जानेवारीपासून खारकोपर-उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 09:38 PM2024-01-12T21:38:49+5:302024-01-12T22:14:17+5:30
खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
- मधुकर ठाकूर
उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१२) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदानातुन उरण -खारकोपर रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले आहे.१३ जानेवारी २०२४ पासून खारकोपर ते उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
खारकोपर-उरण १४.६० मार्ग किमी दुहेरी मार्ग विभाग हा बेलापूर-सीवूड-उरण विभागाच्या २७ मार्ग किमी दुहेरी मार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे .ज्याची एकूण किंमत ३००० कोटी आहे. १४३३ कोटी खर्चाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेचा ३३% आणि सिडकोचा ६७% शेअरींग आहे. यामध्ये शेमतीखार, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण या ४ नवीन स्थानकांसह विभागात १ महत्त्वाचा पूल, २ मोठे पूल, ३९ छोटे पूल, ३ रोड ओव्हर ब्रिज आणि ३ रोड अंडर ब्रिजचा समावेश आहे.
सध्या नेरूळ- बेलापूर आणि खारकोपर दरम्यान चालणाऱ्या ४० उपनगरीय सेवा (२० जोड्या) आता १३ जानेवारीपासून उरणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आणि त्या शेमतीखार, न्हावा-शेवा आणि द्रोणागिरी स्थानकावर थांबतील.उरण ते बेलापूर ते नेरुळ स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत सेवांची वारंवारता प्रत्येक ३० मिनिटांनी, बेलापूर ते उरण आणि नेरुळ ते उरण स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत ६० मिनिटे असेल.
या विस्तारित मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत एकूण १० सेवा धावतील. ईएमयू ट्रेनच्या या विस्तारित सेवा विद्यार्थी, व्यापारी, दैनंदिन प्रवाश्यांना परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था पुरवून मदत होईल त्यामुळे एसईझेड क्षेत्र आणि नवी मुंबईशी संपर्क वाढवतील असेही मध्य रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.