वर्सोवा-विरार सेतूला ४० हजार कोटींचे कर्ज, एमएमआरडीएकडे सर्व कागदपत्रे देण्याचे आदेश
By नारायण जाधव | Published: November 13, 2022 10:08 AM2022-11-13T10:08:12+5:302022-11-13T10:14:00+5:30
Versova-Virar Bridge : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता एमएमआरडीए बांधणार आहे. जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे
- नारायण जाधव
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता एमएमआरडीए बांधणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे या मार्गाचे कामही लवकरात लवकरात हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
या मार्गासाठी आता ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तो ४० हजार कोटींच्या गेला असून, त्यासाठी जायका अर्थसाहाय्य देण्यास तयार असल्याचे महानगर आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्याच्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले.
रस्ते विकास महामंडळाने दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांसह उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा ते विरार ते या ५४ किमीच्या तिसऱ्या सी-लिंकच्या सुसाध्यता अहवालास सप्टेंबर २०२१ मान्यता दिली. होती. सध्या वरळी ते वांद्रा सागरी सेतूनंतर आता वांद्रा ते वर्साेवा या १७.७ किमीच्या सागरी पुलाच्या बांधकामाचे सात हजार कोटींच्या कंत्राटाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या पुलामुळे वांद्रा ते वर्सोवा हे दोन तासांचे अंतर हा पूल झाल्यावर १५ मिनिटांत कापता येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ३३२ कोटींचा आहे.
सल्लागार नेमण्याचे आदेश
एमएसआरडीसीने सर्व कागदपत्रे एमएमआरडीएला देण्याचे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले.
ते मिळाल्यानंतर एमएसआरडीने ते संचालक मंडळासमोर ठेवून तातडीने सल्लागार नेमण्याची कार्यवाही करावी, असेही या बैठकीत ठरले आहे.
भाईंदर-वसई खाडीपुलास लाभ
विस्तारित वर्सोवा-विरार सागरी सेतूचा एमएमआरडीएच्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडीपुलासही मोठा फायदा होणार आहे.
त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल
३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.
भाईंदर खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून, तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे. या पुलावर एमएमआरडीए १० हजार ८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे.
नवी मुंबई विमानतळाला होणार फायदा
मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा संपूर्ण सागरी मार्ग भविष्यात ईस्टर्न फ्री वे आणि विरार-कॉरिडोरसह न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंकला जोडण्यात येणार आहे.
यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक जवळ येतीलच; शिवाय दक्षिण मुंबईसह नवी मुंबई गाठणेही अधिक सुकर होणार आहे. याचा फायदा भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणार आहे.