उल्हासनगर : बांधकाम पूर्णत्वाच्या दाखला (ओसी) प्रकरणी ४०० इमारतींना पालिकेच्या नगररचनाकार विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. वर्षभरात नोटिसांपलीकडे कारवाई झाली नसल्याची टीका होत आहे. बिल्डर व नगररचनाकार विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यातील बहुतांश इमारतींमधील सदनिकांची विक्री झाल्याचे उघड झाले आहे. नगररचनाकार विभागाने गेल्या वर्षी एकूण ४०३ बांधकाम परवाने दिले आहेत. त्यातील बहुतांश बिल्डरांनी वाढीव बांधकाम केल्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, अशा तक्रारी तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी नगररचनाकार विभागाला वर्षभरात किती बांधकामांना परवानगी दिली. तसेच त्यापैकी किती इमारतींनी पूर्णत्वाचा दाखला घेतला, याची माहिती मागवली होती. शहरातील ४०३ इमारतींपैकी तब्बल ४०० इमारतींनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नसल्याचे उघड झाले. त्या सर्वांना नोटिसा पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मात्र, वर्षभरात नोटिसांपलीकडे कुठलीही कारवाई झाली नसल्याचे उघड झाले. प्रशासन बिल्डरांना पाठीशी घालत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही नगररचनाकार विभागाकडे लक्ष दिलेले नाही. विभागाकडून यापूर्वी वर्षाला २५ कोटींचे उत्पन्न मिळत होते. (प्रतिनिधी)
४०० इमारतींकडे ओसीच नाही
By admin | Published: November 18, 2016 2:48 AM