नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्च २०२५ पर्यंत विमानोड्डाण करण्याचे ‘सिडको’चे नियोजन आहे. मात्र, परिसरातील टेकडीचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासह विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगसाठी ती भुईसपाट करणे गरजेचे आहे. त्यासाठी विमानतळ विकासक कंपनी आणि सिडकोकडून गाभा क्षेत्रातील ओवळे गाव परिसरात सुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत. अशा ४०० भूसुरुंग स्फोटांचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात केलेल्या सुरुंगाच्या स्फोटाच्या हादऱ्यामुळे घाबरलेल्या ओवळे ग्रामस्थांनी रस्त्यावरून आंदोलन करून काम बंद पाडले होते. ग्रामस्थांनी विमानतळाचे कामच बंद पाडल्याने सिडको आणि विकासक कंपनीसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. कारण, ओवळे गाव हे विमानतळाच्या गाभा क्षेत्रातच असून, अद्यापही तेथील अनेक ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या ठिकाणी आपला बाडबिस्तारा हलविलेला नाही. मनाप्रमाणे भूखंड न मिळाल्याने ग्रामस्थांनी घरे रिकामी केली नसल्याने ही कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी राहतात. सिडकोकडून मिळणारे भूखंड आमच्या सोयीनुसार ताब्यात द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, तिची पूर्तता सिडकोने अद्याप केलेली नाही.
धुळीचेही प्रदूषण
ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता टेकडीच्या सपाटीकरणासाठी सिडको आणि विकासक कंपनीने सुरुंगाचे स्फोट करणे सुरूच ठेवले आहे. यामुळे आवाजाच्या प्रदूषणासह निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवेचेही मोठे प्रदूषण होत आहे. तसेच हे स्फोट तीव्र स्वरूपाचे असल्याने कानठळ्या बसविणारा आवाज आणि हादऱ्यामुळे घरांना तडे गेले आहेत. त्यातच सीलिंकसाठी परिसरातील दगडखाणी बंद केल्या मग विमानतळासाठीचे हे स्फोट कशासाठी, त्याने आवाज, धुळीचे प्रदूषण होत नाही का, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
दररोज ५० स्फोट
कायदा व सुव्यवस्थेसह ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून टेकडीच्या सपाटीकरणासाठी येत्या काही दिवसांत ४०० स्फोट करणे कसे गरजेचे आहे, याची जाणीव पोलिसांसह सिडकोने ग्रामस्थांनी करून दिली. त्यांचा राग शांत झाल्यानंतर त्यांनीच केलेल्या सूचनेनुसार आता दरदिवशी सकाळी २५ व सायंकाळी २५ असे स्फोट करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले.
शेती घेतली, आता निवाराही धोक्यात
‘सिडको’ने आपली शेती घेतली, आता आहे तो निवाराही धोक्यात आणल्याने ओवळे ग्रामस्थांत सिडकोसह विमानतळ विकासक कंपनीविरोधात संतापाची भावना आहे. तिचा उद्रेक गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी विमानतळाचे काम बंद पाडून दाखवून दिला. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता काही विपरित होऊ शकते, याची जाणीव नवी मुंबई पोलिसांना झाली. यामुळे त्यांनी समयसूचकता दाखवून ग्रामस्थांचे प्रतिनिधी, सिडको, विमानतळ विकासक कंपनीत समेट घडवला.